Solapur news – अक्कलकोटला जाताना अनर्थ घडला, पनवेलच्या भाविकांवर काळाची झडप; भीषण अपघातात 5 जण ठार

नवी मुंबईतील पनवेल येथून अक्कलकोटला स्वामी समर्थांच्या दर्शनाला निघालेल्या भाविकांवर काळाने झडप घातली. पुणे-सोलापूर महामार्गावर मोहोळजवळ शनिवारी रात्री झालेल्या भीषण अपघातामध्ये पाच जणांचा मृत्यू झाला तर, एक महिला गंभीर जखमी झाली आहे. जखमी महिलेवर मोहोळमधील रुग्णालयात उपचार सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पनवेलमधील भाविक एरटिका गाडीने (गाडी क्र. एमएच 46, झेड 4536) अक्कलकोट येथे स्वामी समर्थांच्या दर्शनाला निघाले होते. मात्र मोहळनजीक देवडी फाट्याजवळ चालकाचा गाडीवरील ताबा सुटला आणि अनियंत्रित गाडी रस्त्याच्या कटेला असलेल्या झाडावर आदळली. हा अपघात एवढा भीषण होता की एरटिका गाडीचा पार चक्काचूर झाला आहे. या अपघातात 5 जणांचा जागीच मृत्यू झाला, तर एक महिला जखमी झाली.

मृतांमध्ये तीन पुरुष आणि दोन महिलांचा समावेश आहे. माला रवी साळवे (वय – 60), अर्चना तुकाराम भंडारे (वय – 47), विशाल नरेंद्र भोसले (वय – 41), अमर पाटील, आनंद माळी अशी मृतांची नावे आहेत. तर ज्योती टाकले असे गंभीर जखमी झआलेल्या महिलेचे नाव आहे. त्या रायगड जिल्ह्यातील पनवेल मधील सेक्टर 7 मधील रहिवासी आहेत. त्यांच्यावर मोहोळ येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातग्रस्त वाहन रस्त्यावरून हटवण्यात आले असून पुढील तपास मोहोळ पोलीस स्टेशनमधील पोलीस निरीक्षक शेडगे करत आहेत. या घटनेची नोंद करण्यात आलेली आहे.