शैलगृहांच्या विश्वात – कुमारी पर्वतातील शैलगृहे

>> डॉ. मंजिरी भालेराव

सर्वात प्राचीन मानवनिर्मित शैलगृहांची परंपरा मौर्यांच्या नंतर पूर्व भारतात खंडित झाली नाही, तर कलिंग देशात म्हणजे आजच्या ओडिशामध्ये सुरू राहिलेली दिसते. याचा एक अतिशय महत्त्वाचा पुरावा भुवनेश्वरजवळील उदयगिरी खंडगिरी या प्रसिद्ध असलेल्या शैलगृहांच्या स्वरूपात पाहायला मिळतो.

‘शैलगृहांच्या विश्वात’ या मालिकेत आपण या प्रस्तरातील निवासांची माहिती घेत आहोत. आपण जेव्हा भारतातील सर्वात प्राचीन मानवनिर्मित आणि ज्यांचा काळ निश्चितपणे सांगता येतो अशा शैलगृहांचा विचार करतो तेव्हा असे दिसते की, अशी शैलगृहे इ.स. पूर्व 3ऱया शतकात बिहारमध्ये मौर्य राजांच्या काळात तयार केली गेली, पण मौर्यांच्या नंतर पूर्व भारतात ही परंपरा खंडित झाली नाही, तर कलिंग देशात म्हणजे आजच्या ओडिशामध्ये ती सुरू राहिलेली दिसते. याचा एक अतिशय महत्त्वाचा पुरावा भुवनेश्वरजवळील उदयगिरी खंडगिरी या नावाने प्रसिद्ध असलेल्या शैलगृहांच्या स्वरूपात पाहायला मिळतो. ओडिशामधील लेणी ही जैन मुनींसाठी केलेली होती. या शैलगृहात अनेक शिलालेख आहेत. त्यामधील उल्लेखानुसार या स्थळाचे नाव ‘कुमारी पर्वत’ असे आहे.

उदयगिरी आणि खंडगिरीयेथील लेण्यांची निर्मिती साधारणपणे इसवी सनपूर्व दुसऱया शतकात झाली. रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेल्या उदयगिरी आणि खंडगिरी या नावाने प्रसिद्ध असलेल्या या लेणी जैन मुनींसाठी केलेल्या सर्वात प्राचीन लेणी समूहांपैकी एक आहेत. या लेणी समूहाबद्दलची माहिती इथे असलेल्या ब्राह्मी लिपी आणि प्राकृत भाषेतील शिलालेखांमधून मिळते. चेदी कुळातील आणि महामेघवाहन वंशातील राजा श्री खारवेल याने इ.स. पूर्व दुसऱया शतकात या शैलगृहांची निर्मिती करायला सुरुवात केली. या टेकडय़ांमध्ये आधीच नैसर्गिक गुहा असायची शक्यता नाकारता येत नाही. त्यांचा वापर कदाचित जैन मुनी करत असतील. त्यांनाच अजून चांगले रूप देऊन त्यात काही गुंफांची भर राजा खारवेल याने घातली असावी.

काळाच्या ओघात या दोन्ही टेकडय़ांमधील शैलगृहांना स्थानिक लोकांनी विविध प्रकारची नावे दिली. हत्तीचे शिल्प असल्याने हाथी गुंफा, राजकुळातील व्यक्ती, त्यांची मिरवणूक हे दाखवल्याने राणी गुंफा, लेण्यात पोपट कोरल्याने ‘ततोवा’ अशी वेगवेगळी नावे आज लोक वापरतात. उदयगिरीमध्ये 18 लेणी आहेत, तर खंडगिरीमध्ये 15 लेणी आहेत. त्यामध्ये काळाच्या ओघात काही हिंदू आणि काही जैन तीर्थंकरांची शिल्पेही कोरली आहेत. यामध्ये राजा खारवेल याच्या व्यतिरिक्त इतर अनेक लेख आहेत. त्यातले काही त्याच्या कुटुंबीयांचेही आहेत. त्याची अग्रमहिषी, त्याच्याच घराण्यातील ‘कुदेपसिरी’ , ‘कुमार वदुख’, ‘कम्म आणि हलखिन’ यांची दाने, तसेच सोमवंशी घराण्यातील लोकांची दानेही इथे कोरलेली आहेत, तर एक देवनागरी लिपीमधला लेखही इथे पाहायला मिळतो.

येथील गुंफांमध्ये राणी गुंफा हे सर्वात मोठे आणि दोन मजली लेणे आहे. यात सुंदर नक्षीकाम आणि युद्धाचे देखावे पाहायला मिळतात. अनेक प्रकारची शिल्पं इथे दोन्ही मजल्यांवरील भिंतींवर कोरलेली आहेत. त्यात खालच्या मजल्यावरील एका शिल्पात एक रानटी हत्ती लोकांवर चालून येत असल्याचे दाखवले आहे. या दृश्यात काही स्त्रिया हत्तीपासून स्वतचा बचाव करताना आणि त्याला शांत करण्याचा प्रयत्न करताना दिसतात. वरच्या मजल्यावरील कमानींवर नर्तक आणि संगीतकारांची चित्रे कोरलेली आहेत. येथील दोन्ही मजल्यांवर जैन मुनींच्या साधनेसाठी खोल्या कोरलेल्या आहेत.

एका गुहेचे प्रवेशद्वार वाघाच्या जबडय़ासारखे दिसते म्हणून याला व्याघ्र गुंफा म्हणतात. याशिवाय इथे गणपती कोरलेला असल्याने गणेश गुंफा, पातालपुरी गुंफा अशा नावांनी प्रसिद्ध असलेल्या लेणीसुद्धा आहेत. खंडगिरीमधील शैलगृहांमध्ये अनंत गुंफा, नवमुनी आणि बाराभुजी गुंफा या नावांची शैलगृहे आहेत. यामध्ये काही ठिकाणी लक्ष्मी, सूर्य आणि इतर देवतांची शिल्पे कोरलेली आहेत, तर नवमुनीमध्ये नऊ तीर्थंकरांच्या मूर्ती कोरलेल्या आहेत. चक्रेश्वरी ही 12 हातांची जैन देवता असलेल्या गुंफेला ‘बाराभुजी’ असे नाव पडले आहे. काही ठिकाणी 24 जैन तीर्थंकरांच्या प्रतिमाही पाहायला मिळतात.

येथे जैन मुनींना राहण्यासाठी खोल्या, झोपायला दगडी बाके आणि पिण्यासाठी पाण्याची टाकीसुद्धा कोरलेली आहेत. येथील खोल्यांचा आणि त्यातील दगडी बाकांचा आकारसुद्धा बराच लहान आहे. त्यावरून त्यांचा नेमका कार्यकारणभाव कळणे थोडेसे अवघड जाते. जैन मुनींसाठी केलेल्या या सोयी या उत्तरकालीन जैन गुंफांमध्ये पाहायला मिळत नाही. भारतात इ.स. 6 व्या शतकानंतर बऱयाच जैन गुंफांची निर्मिती झाली. बदामी, वेरूळ, सित्तनवासल इ., पण त्यामध्ये कुठेही राहायची सोय नाही. ती प्रामुख्याने पूजेची मंदिरे आहेत. त्यात बऱयाच तीर्थंकर, देवदेवता, यक्ष-यक्षी, कधी जैन मुनी, तर कधी दान देणारे श्रावक यांच्याही मूर्ती पाहावयास मिळतात. त्यामुळे अशा प्रकारच्या राहण्यासाठी निर्माण केलेल्या गुंफा अतिशय महत्त्वाच्या आणि दुर्मिळ ठरतात.

येथील हाथी गुंफा या लेण्यातील राजा खारवेल याचा शिलालेख हा प्राचीन भारतीय इतिहासाचा एक अत्यंत मौल्यवान दस्तऐवज मानला जातो.या लेखाची सुरुवात जैन धर्मातील ‘नमो अरहंताणं, नमो सव्वसिद्धाणं’ या नवकार महामंत्रासारख्या वंदनेने होते, ज्यावरून खारवेल हा जैन धर्मीय होता हे स्पष्ट होते. या लेखात राजाने त्याच्या आयुष्यातील विविध टप्प्यांवर काय काय केले याची माहिती दिली आहे. तसेच तो किती पराक्रमी आणि लोककल्याणकारी कामे करणारा राजा होता हेही त्यात सांगितले आहे. खारवेलने दक्षिण भारतात आणि उत्तर भारतात केलेल्या लष्करी मोहिमांचीही माहिती यात दिली आहे. त्याने दुष्काळ निवारणासाठी कालवे खोदल्याचा आणि प्रजेसाठी केलेल्या इतर कल्याणकारी कामांचा उल्लेख यात आहे. नंद राजाने कलिंगमधून नेलेली ‘कलिंग जीन’ (जैन तीर्थंकराची प्रतिमा) खारवेलने पुन्हा कलिंगमध्ये आणल्याचा उल्लेख या लेखात आहे. हा उल्लेख मूर्तिपूजेच्या प्राचीनतेवर प्रकाश टाकतो. राजकीय इतिहासाच्या दृष्टीने पहिले तर यामधील सातवाहन राजा सिरी सातकणी (नागनिकेचा पती) याचा खारवेलाने केलेला पराभव हा एक महत्त्वाचा ऐतिहासिक दुवा आहे. तसेच पाटलीपुत्र येथील शुंग राजा बृहस्पतीमित्र याचा केलेला पराभव आणि खारवेलाच्या पराक्रमाच्या कथा ऐकून घाबरून पळून गेलेला यवनराजा दिमित याचाही उल्लेख या लेखात आहे. इ.स.पूर्व 2ऱया शतकातील या लेखामुळे तत्कालीन भारतातील राजकीय परिस्थिती कशी होती हे आपण समजून घेऊ शकतो. एकंदरीतच उदयगिरी खंडागिरी येथील लेणी प्राचीन भारतातील राजकीय आणि सांस्कृतिक परिस्थितीचे एक महत्त्वाचे चित्र आपल्यासमोर उभ्या करतात.
(लेखिका टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, पुणे येथे संस्कृत व भारतीय विद्या अध्ययन केंद्राच्या विभागप्रमुख आहेत.)

[email protected]