
>> अरुण
सिक्वोइया नावाचं एक महाउत्तुंग आणि रुंद खोडाचं झाड आहे. या झाडाच्या खोडाला रेडवूडसुद्धा म्हणतात. ही पृथ्वीवरची सर्वात उंच आणि भक्कम झाडं. वास्तविक निसर्गाने एवढी उत्तुंगता आणि भलीभक्कम ‘देहयष्टी’ दिलेली असताना या झाडांवर अशी काय संक्रांत आली की त्यांचं वर्णन ‘एन्डेजर्ड’ किंवा नष्टतेच्या ‘उंबरठय़ावरची झाडं’ अशा प्रकारे करावं लागतंय?अमेरिकेच्या पश्चिम भागात म्हणजे कालिफोर्निया राज्यात युरोपीय पोचले तेव्हा त्यांच्यातल्या आागस्टस डोव्हड या शिकाऱयाच्या नजरेत प्रथमच हे महावृक्ष भरले. ही 1852ची गोष्ट आणि एकदा माणसाची ‘नजर लागली’ की पृथ्वीवरच्या भल्याभल्या पर्वताचं आणि वनश्रीचं काय होतं ते नव्याने सांगण्याची गरज नाही. तर या आागस्टसने हे प्रचंड जाडीचं आणि उंचीचं एक झाड कापलं नि त्याच्या खोडाची 1853मध्ये अमेरिकाभर ‘मिरवणूक’च काढली.
परिणाम ‘टुरिझम’ सुरू झाला. हवशे-गवशे-नवशे ही ‘जायंट सिक्वोइया’ची झाडं पाहायला येऊ लागले, पण त्यापूर्वीही 1850च्या सुमारास वुडस्टर यानी ही झाडं पाहून त्यांना ‘हर्क्यूलस’ (पृथ्वी तोलणारा) असं नाव दिलं होतं. खरं तर हे महावृक्ष पृथ्वीवर घट्ट मुळं रोवून 85 मीटर उंचीपर्यंत वाढून ‘आकाश पेलत’ होते! त्यांच्या खोडांचा व्यास कमीत कमी 6 ते 8 मीटर असायचा. त्यातील सर्वोच्च उंचीचा ‘सिक्वोइया’ वृक्ष तर 17 फूट रुंदीच्या खोडाचा आणि 94 मीटर म्हणजे 311 फूट उंचीचा होता. थोडक्यात 31 मजली इमारतीएवढा! 2014 ते 16मध्ये यापेक्षाही मोठे रेडवूड वृक्ष सापडले असं म्हटलं गेलं. ‘फारेस्ट किंग’चा मान लाभलेल्या या वृक्षांना माणूस नावाच्या प्राण्याने मात्र यातना दिल्या. त्यांच्या महाखोडापासून मोटारी जातील असे रस्ते पोखरून काढले. याशिवाय ‘रेडवूड‘चा लाकडी सामानासाठी वापर करणाऱयांना ही प्रचंड झाडं म्हणजे घबाडच मिळालं. त्यात त्यांची कत्तल होऊ लागली.
हे मानवी संकट कमी म्हणून की काय, पालिफोर्नियातील जंगलात महिनोन्महिने धगधगणाऱया नैसर्गिक आगी लागायला सुरुवात झाली. त्यातच दुष्काळानेही या झाडांची होरपळ केली. या झाडांपैकी जनरल शेमनच्या नावाचं झाड 2100 टन वजनाचं तर ‘वाशिंग्टन ट्री’चा पसारा 47850 घनफूट एवढा प्रचंड. तशी ही झाडं जगात इतरत्रही आहेत, पण त्यांची ‘तोड‘ लक्षात घेता त्यांची लागवड आहेत त्याच्या 30 पट करावी लागेल. हीच या रेडवूडची मूक वेदना आहे.


























































