
>> धीरज कुलकर्णी
स्त्रीशी संबंधित विषय हा फक्त स्त्रियांच्या बाबतीत नव्हे, तर पूर्ण समाजाच्या बाबतीत महत्त्वाचा असतो हे ठामपणे लेखणीतून मांडणाऱ्या कमला दास. स्त्री हुंकाराचा आवाज ठरणाऱ्या श्रेष्ठ मल्याळम कवयित्री कमला दास ऊर्फ माधवी कुट्टी यांचे आयुष्य त्यांच्या विचारकाव्यांप्रमाणेच वादळी आणि झंझावाती ठरले.
स्वत, समाज आणि एकंदरीतच आयुष्य यांच्याशी असलेली एक विलक्षण बांधिलकी हा कवीचा महत्त्वाचा गुण म्हणायला हवा. स्वसंवेद्य विषयांना मूर्तरूप देऊन शब्दांच्या अवकाशात ते चपखलपणे मांडत असताना कवितेत कुठेही तडजोड केलेली चालत नाही. तसेच सामाजिक विषय जे प्रत्येकाच्या रोजच्या जीवनाशी संबंधित आहेत, अशा विषयातही शब्दांची निवड करताना एक धाडस दाखवावे लागते.
जरी कविता ही आतून स्फुरत असली तरी ती कागदावर मांडत असताना कवीला बरीच कसरत करावी लागते. त्यामुळे काळाच्या परिघात कवितेचे मूल्यमापन करत असताना कवी ज्या परिस्थितीतून गेला आहे तीसुद्धा लक्षात घेणे गरजेचे आहे. श्रेष्ठ मल्याळम कवयित्री कमला दास ऊर्फ माधवी कुट्टी. आयुष्याच्या शेवटापर्यंत अगदी नव्वदीच्या घरातही त्यांची लेखणी धारदारपणे सुरू राहिली.
स्त्रीशी संबंधित विषय हा फक्त स्त्रियांच्या बाबतीत नव्हे, तर पूर्ण समाजाच्या बाबतीत महत्त्वाचा असतो, हे ठामपणे गेली सहा दशकाहून अधिक काळ त्यांनी सतत बजावले. मल्याळम व इंग्रजी भाषेतून समर्थ रचना सादर केल्या. आकाशवाणी, दूरदर्शनसाठी लेखन केले. वृत्तपत्रात स्तंभलेखन केले.
कमला दास ऊर्फ कमला सुरय्या ऊर्फ माधवीकुट्टी यांचा जन्म 31 मार्च 1934 ला केरळमध्ये एका संपन्न नायर कुटुंबात झाला. वडील व्ही. एम. नायर हे ‘मातृभूमी’ या प्रख्यात नियतकालिकाचे संपादक होते, तर आई बालमणी अम्मा या कवयित्री. अशाप्रकारे साहित्याचा वारसा कमला यांना घरातूनच प्राप्त झाला. वडिलांच्या नोकरीमुळे त्यांचे बालपण कलकत्ता येथे गेले. लहानपणापासूनच कमला यांना वाचन व कविता करणे याची आवड निर्माण झाली. वयाच्या अवघ्या 15 व्या वर्षी त्यांचा विवाह के. माधव दास यांच्याशी झाला. पतीने त्यांना पुढे शिकण्यास प्रोत्साहन दिले.
साठच्या दशकातील कोलकत्यात सांस्कृतिक क्षेत्रात अनेक घडामोडी सुरू होत्या. जुनी मांडणी मोडून नवी होत होती. याचा प्रभाव कमला यांच्यावर पडला. सुरुवातीच्या काळात त्यांनी इंग्रजी भाषेत कविता व लघुकथा लिहिल्या, ज्या लोकप्रिय झाल्यामुळे त्यांना प्रसिद्धी मिळाली. लिहिताना जुनी शैली न स्वीकारता त्यांनी एक स्वतंत्र शैली निर्माण केली. स्वतचा संघर्ष, दुःखे यातून त्यांना प्रेरणा मिळत गेली. कमला दास यांची लेखनशैली सुबोध तरीही थेट आणि अंतकरणाला भिडणारी आहे. कवितांसाठी निवडलेले विषय हे त्या काळच्या मानाने बरेच स्फोटक म्हणायला हवेत.
‘घामाची कस्तुरी’ किंवा ‘पाळीच्या रक्ताने बसलेला धक्का’ या कवितांमध्ये त्यांनी केलेली शब्दांची निवड पाहून थक्क व्हायला होते. कमला दास यांनी छंदोबद्ध रचनेपेक्षा मुक्तछंदाला प्राधान्य दिले. कमला दास यांच्या कथा व कविता यात सामाजिक, कौटुंबिक विषय याबरोबरच लहान मुले, स्त्रिया यांचे भावविश्व समर्थपणे चितारले आहे. या कविता बऱयाचशा आत्मनिवेदन व कबुलीजबाब दिल्याच्या छटा दाखवतात. त्यामुळे त्याकाळी सिल्व्हिया प्लाथ, अॅन सेक्सटन, रॉबर्ट लोवेल यांच्याशी त्यांची तुलना केली जाऊ लागली.
स्त्रीची लैंगिकता याबद्दल साठेक वर्षांपूर्वी बोलणेही अशक्य होते, त्या काळात कमला यांनी प्रेम, अभिलाषा, लैंगिकता हे विषय मुक्तपणे हाताळले. यामध्ये स्वैराचार नसून, पितृसत्ताक पद्धती आणि समाजरचना याबद्दलचे बंड आहे.
माधवीकुट्टी या नावाने त्यांनी मल्याळम भाषेतून जे गद्यलेखन केले, तेही लोकप्रिय झाले. त्यावर आधारित अनेक दृश्यकलाकृती बनल्या. ‘माय स्टोरी’ हे त्यांचे आत्मचरित्र म्हणजे आदर्श लेखनाचा नमुनाच आहे. आयुष्याकडे बघण्याचा स्त्राrचा दृष्टिकोन, सर्व सभोवती असतानाही तिचा एकटेपणा, मृत्यूची दाहकता हे सगळे विषय त्यात वाचायला मिळतात.
केरळ साहित्य अकादमी, केंद्रीय साहित्य अकादमी, पेन एशियन पुरस्कार असे अनेक पुरस्कार त्यांना प्राप्त झाले. ऐंशीच्या दशकात स्त्रिया व लहान मुले यांच्या उत्थानासाठी त्यांनी एक राजकीय पक्षही स्थापन केला. मात्र, राजकारण आणि निवडणुकीतील अपयशाने त्या नैराश्याने ग्रासल्या. काही काळ आपल्या बहिणीकडे अण्णामलई पर्वतावर त्या गेल्या. या काळात त्यांनी ‘अण्णामलाई पोएम्स’ नावाने कवितासंग्रह लिहिला. आयुष्याच्या उत्तरार्धात त्यांनी इस्लाम धर्म स्वीकारला आणि कमला सुरय्या हे नाव घेतले.
अशा या वादळी आणि झंझावाती आयुष्याची 2009 साली पुण्यात अखेर झाली. त्यांच्या निधनाने स्त्राr हुंकाराचा एक आवाज कमी झाला, तरी पूर्वी त्यांनी जे काम केले त्यामुळे असंख्य स्त्रियांना आपला स्वतचा आवाज प्राप्त झाला हेही खरे.



























































