
>> रविप्रकाश कुलकर्णी
मराठी साहित्य व्यवहारात मासिकांनी मोठी कामगिरी केलेली आहे. या वाटेवर मासिक ‘रत्नाकर’चे योगदान मोठे आहे. दीनानाथ दलाल आणि रघुवीर मुळगावकर यांनी आपल्या अनुक्रमे ‘दीपावली’ आणि ‘रत्नप्रभा’ या अंकातून मराठी वाचकांना चित्रांची गोडी लावली. चित्रेही जशी पाहायची असतात त्याप्रमाणे त्याचा संग्रह जपून ठेवायचा असतो हे वळण त्यांनी घालून दिलं हे खरंच. ही झाली त्या दोन चित्रकारांची कामगिरी. पण मराठी मासिकाच्या मुखपृष्ठावर तसंच आतमध्येदेखील मोठय़ा चित्रकाराचं चित्र देण्याची परंपरा सुरू केली ती ‘रत्नाकर’ने. त्या मासिकाचे संपादक होते ना.सी. फडके आणि मग बाकी सर्व जबाबदारी घेतली अनंत सखाराम गोखले ऊर्फ आप्पासाहेब गोखले यांनी.
ना.सी. फडके त्यांची प्राध्यापकीय मुशाफिरी दिल्ली, नागपूर वगैरे ठिकाणी करून झाल्यानंतर परत पुण्यात परतले. हाताशी नोकरीधंदा नव्हता. त्यामुळे त्यांच्या हाताशी वेळच वेळ होता. अशा मोक्यावर त्यांची अप्पासाहेब गोखले यांच्याशी गाठभेट झाली. नोकरीच्या फंदात पडण्याऐवजी त्यांनी मासिक संपादित करावे असा प्रस्ताव फडके यांच्यापुढे ठेवला. विशेष म्हणजे, असाच काहीसा विचार फडक्यांच्या डोक्यात आला होता. पण आर्थिक परिस्थितीत त्यांना ते करणे अशक्य होते, पण गोखले यांनी मासिकाचा प्रस्ताव ठेवताच फडके तयार झाले. त्याप्रमाणे ‘रत्नाकर’ची निगराणी तयारी सुरू केली. ‘रत्नाकर’चा नमुना अंक दणक्यात निघाला. त्या यशाने उत्साहित होऊन ‘रत्नाकर’ मासिकाचा पहिला अंक जानेवारी 1926 रोजी प्रकाशित झाला. उच्च प्रतीचे केवळ साहित्य न देता ‘रत्नाकर’ने ह्याबरोबरच वाचकांची बहुश्रुतता आणि विचारक्षमता वाढण्याच्या दृष्टीने अंकाची आखणी केली. संगीत, नृत्य, शिल्प, चित्रकला, क्रिकेट, टेनिस अशा विविध विषयांवर अभिरुची निर्माण करणारे मासिक ही त्याची ओळख ठरली. धुरंधर, त्रीनिनाद, बाबुराव पेंटर, हळदणकर, अशा नामवंत चित्रकारांची चित्रे आणि त्याबरोबर त्या चित्रांचा आस्वाद या अंकात येऊ लागला. असं काही मराठी मासिकाच्या बाबतीत प्रथमच घडत होतं.
ठाकूर सिंग यांच्या ‘ओलेती’ या चित्राने चित्राच्या अभिरुचीबद्दलच प्रश्न उभे झाले. त्यावर अश्लीलतेचा आरोप झाला. पण ‘काळ’कर्ते शि. म. परांजपे यांनी या चित्राची योग्य पाठराखण केली. एखाद्या चित्राकडे कलात्मक दृष्टीने कसे पाहावे याचा तो आदर्श वस्तुपाठ होता. ‘रत्नाकर’चा प्रत्येक अंक म्हणजे विशेषांक वाटावा अशी त्याची निर्मिती होत होती. त्यांचा ‘बालगंधर्व विशेष अंक’ म्हणजे म्हणजे बालगंधर्व युग काय होतं याची श्रीमंती दाखवणारा होता. त्यानंतर बालगंधर्वांवरती अनेक अंक निघाले, पण ‘रत्नाकर’चे वेगळेपण आजही अबाधित आहे! यावरून या अंकाची श्रीमंती कळावी.
दुर्दैवाने आर्थिक ताळेबंद न जमल्यामुळे ‘रत्नाकर’ची मे 1933 मध्ये इतिश्री झाली. मात्र ‘रत्नाकर’चे मोल अबाधित राहिले. काळाच्या ओघात विस्मृतीत गेलेला हा ठेवा नव्याने नव्या पिढीला कळावा म्हणून ना.सी. फडके यांची कन्या गीतांजली जोशी आणि सुनिधी प्रकाशन यांच्या प्रयत्नाने आता त्याचे पुनर्मुद्रण होत आहे. काळाच्या ओघात काही गोष्टी कशा विरत जातात ते पहा. यानिमित्ताने ‘रत्नाकर’च्या अनंत सखाराम ऊर्फ आप्पासाहेब गोखले यांच्याप्रति कृतज्ञता भाव व्यक्त करावा या भावनेने त्यांच्या वंशजांचा सत्कार करावा अशी योजना होती. पण दुर्दैवाने त्यांच्यापैकी एकाचाही थांगपत्ता या घटकेपर्यंत लागलेला नाही. त्यासाठी अथक प्रयत्न करून झाले.
तरीही अजून आशा ठेवावी. ‘रत्नाकर’च्या पहिल्या अंकाच्या पुनर्मुद्रणाचा प्रकाशन समारंभ आज म्हणजे 25 जानेवारी रोजी पुण्यात गणेश हॉल येथे होतो आहे. हे टिपण वाचून आप्पासाहेब गोखलेंच्या वंशजांनी तेथे यावे. त्यांचे स्वागतच होईल. मराठी मासिकाच्या जगात ही एक वेगळी घटना आहे. त्याचे स्वागतच करायला हवे.


























































