
>> राजेंद्र मुंढे
प्रणव सखदेव यांचे ‘के कनेक्शन्स’ हे पुस्तक वाचताना प्रथम जाणवते ते त्यातील साध्या स्वरूपाची मोहिनी. वरवर पाहता बालपणातील काही तुटक आठवणींचा कोलाज वाटणारा हा ‘सफरनामा’ प्रत्यक्षात एका संपूर्ण सामाजिक, सांस्कृतिक आणि मानसिक परिसराचे जिवंत चित्र उभे करतो. ‘के’ या नायकाच्या अनुभवांवर आधारलेली ही कथा घटना आणि संवाद यापुरती मर्यादित न राहता वातावरण निर्मिती, भूसंस्कृती, बहुभाषिकता, बहुधार्मिकतेची सहजीवन जाणीव, भाषा आणि अवकाश या सर्व घटकांचा सक्षम आधार घेत पुढे सरकते. त्यामुळे ती केवळ एका मुलाच्या आठवणींचे पुस्तक न ठरता त्या काळाच्या एका समाजमनाची स्मरणगाथा बनते. कल्याण शहराच्या 1990च्या दशकातील बाजारपेठ, शाळा, तलाव, क्रिकेटचे मैदान, ग्रंथालय अशा स्थानांचे तपशील लेखकाने इतक्या सहजतेने रंगवले आहेत की, वाचक त्या काळाच्या रेटय़ात स्वतला सामील समजतो. त्या ठिकाणांचे वर्णन करताना कोणताही आडपडदा नाही; प्रत्येक तपशील त्या परिसरातल्या माणसांच्या नित्य जीवनाशी जोडलेला आहे. कडबोळेमावशींसारख्या व्यक्तिरेखांमधून त्या काळातील साध्या जगण्याचे मोठे अर्थ समोर येतात. “स्टेशन महत्त्वाचं नसतं, लोकल महत्त्वाची नसते. सोबतचा माणूस महत्त्वाचा नसतो, आपला प्रवास महत्त्वाचा असतो…” अशा वाक्यांतून एका पिढीच्या जगण्याचा दृष्टिकोन व्यक्त होतो; त्या वाक्यातून परिस्थितीशी लढत जगण्याची जीवनशैली उलगडते. या कथेला व्यापकता मिळते ती केवळ व्यक्तिरेखांमुळे नव्हे, तर त्या काळातील सामाजिक संरचनेमुळेही. मध्यमवर्गीय सुशिक्षित वस्ती, त्यातले खेळ, शिक्षण, नातीगोती आणि आर्थिक मर्यादा यांचे चित्रण जसे आहे, तसेच त्या परिसरात राहणाऱया विविध धार्मिक व भाषिक गटांचे सहजीवनही सूचकतेने दिसून येते. हुसेनभाई गोळेवाला, मेघादीदी, सालुकेबाई, भाजीवाली अक्का अशी विविध पार्श्वभूमी असलेली पात्रे एकत्र नांदताना दिसतात. त्यांच्या संवादांमधून कोणताही सांस्कृतिक संघर्ष जाणवत नाही; उलट त्या परस्पर सहजीवनाच्या नैसर्गिकतेला अधोरेखित करतात. त्यामुळे कथा एका विशिष्ट समुदायावर केंद्रित न राहता संपूर्ण समाजाची झलक दाखवते. भाषेच्या बाबतीतही ही कादंबरी विशेष ठरते. कोणतेही आलंकारिक किंवा जड शब्द न वापरता त्या काळातली बोली आणि नैसर्गिक संभाषणे यांचा आधार घेऊन कथा पुढे सरकते. काही वाक्ये तर जीवनाचे तत्त्व सांगणारी वाटतात. ‘अडथळे नेहमी असतातच राजा…’ या वाक्यातून एका व्यक्तीचे नव्हे तर संपूर्ण समाजाचे जगण्याचे तत्त्वज्ञान समोर येते. या साध्या, पण अर्थगर्भ भाषेमुळे कथा वाचकाच्या मनात सहज रुतते. त्या काळाची भाषा, त्या वेळच्या लोकांचे बोलणे, त्यांचा स्वभाव हे सगळे सहजतेने समोर येते. अवकाश हादेखील या कथेला जिवंत करणारा महत्त्वाचा घटक आहे. कल्याण हे केवळ एक भौगोलिक स्थान न राहता ‘के’च्या आठवणींचे केंद्र बनते. स्टेशनवर उतरताना त्याला कडबोळेमावशी आठवतात, बाजारात फिरताना परिचित चेहरे समोर येतात, तलाव आणि मैदान यांचे स्मरण त्याच्या बालपणातील खेळ आणि आनंद जागवते. त्यामुळे प्रत्येक स्थळाची भावनिक किंमत वाढते. त्यातून कथेला वास्तवाची छटा मिळते आणि वाचक त्या अवकाशात रमतो. कथेतील प्रत्येक प्रसंग, संवाद किंवा छोटय़ा घटनांमधून जरी बालपणातील गोंधळ, हरवलेपण आणि तुटलेपण यांची जाणीव जागी होत असली तरी त्यातून जीवनाचा मोठा अर्थ उलगडतो. ‘के’च्या मनात उमटणारे प्रश्न आणि त्याची अस्वस्थता वाचकाच्या मनातही प्रतिध्वनित होते. त्याच्या अनुभवांमधून वाचकाला आपल्या आयुष्यातील अडथळे, आनंद आणि निराशा यांचा शोध घेण्याची संधी मिळते. त्यामुळे ही कथा एका मुलाच्या आठवणींवर आधारित असली तरी तिचा प्रभाव व्यापक आणि समावेशक ठरतो. या सर्व घटकांचा विचार केला असता ‘के कनेक्शन्स’ ही कादंबरी फिक्शनच्या व्यापक संकल्पनेला योग्य न्याय देणारी कलाकृती आहे. घटना आणि संवाद यांच्या पलीकडे जाऊन वातावरण निर्मिती, भू संस्कृती, बहुभाषिकता, बहुधार्मिकता, भाषा आणि अवकाश यांच्या सुसंगत आणि सूचक वापरामुळे कथा पूर्णत्वास पोहोचते. ही कथा वाचकाला त्या काळात घेऊन जाते, त्याला त्या लोकांशी जोडते आणि जीवनातील साध्या, पण अर्थपूर्ण क्षणांचा शोध घेण्यास प्रेरित करते. त्यामुळे ही कादंबरी केवळ बालपणाच्या आठवणींचे पुस्तक राहत नाही, तर त्या काळातील एका संपूर्ण समाजाच्या जीवनाचा दस्तऐवज बनते. वाचक ‘के’सोबत प्रवास करत राहतो, त्या प्रवासात अडथळे असले तरी त्यातून जीवनाची खरी ओळख मिळते आणि त्यामुळे ही कथा दीर्घकाळ स्मरणात राहते. अशा प्रकारे ‘के कनेक्शन्स’ ही मराठी साहित्यातील एक वेगळी आणि समृद्ध भर मानावी लागते.
कनेक्शन्स
लेखक ः प्रणव सखदेव
प्रकाशन ः रोहन प्रकाशन
पृष्ठे ः 192 ह मूल्य ः 275/-

























































