मुंबईत बिहार भवन उभारणारच, भाजप मंत्र्याची दर्पोक्ती

‘मुंबईत बिहार भवन उभारणारच, ताकद असेल तर ते रोखून दाखवा,’ अशी दर्पोक्ती बिहारच्या भाजप-जेडीयू सरकारमधील मंत्री अशोक चौधरी यांनी केली आहे. त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे.

मुंबईतील पोर्ट ट्रस्टच्या जागेवर 30 मजली बिहार भवन बांधण्याचा प्रस्ताव आहे. त्यासाठी बिहार सरकारने 315 कोटी रुपये मंजूर केले आहेत. शिवसेना व मनसेने यास तीव्र आक्षेप घेतला आहे. ‘पाटण्यात 30 मजली महाराष्ट्र भवन उभारण्यासाठी आपल्या सरकारने बिहार सरकारकडे पाच एकर जमिनीची मागणी करावी, त्यानंतरच बिहार भवनचा विचार करावा, असे शिवसेना नेते-खासदार संजय राऊत यांनी ठणकावले आहे, तर बिहारी रुग्णांसाठी मुंबईत बिहार भवन बांधण्यापेक्षा त्या पैशात बिहारमध्येच कॅन्सरचे रुग्णालय उभारा, अशी सूचना मनसेने केली आहे.

शिवसेना मनसेच्या या भूमिकेनंतर आज नितीश कुमारांच्या मंत्र्याने आव्हानाची भाषा केली. ‘देशात राजेशाही आहे का? ठाकरे हे महाराष्ट्राचे राजे आहेत का? महाराष्ट्र कोणाच्या बापाचा नाही. भवन उभारू देणार नाही म्हणजे काय? अशा पद्धतीने कोणी जबरदस्तीने विरोध करू शकत नाही,’ असे चौधरी म्हणाले. ‘मुंबईत कॅन्सर किंवा इतर मोठय़ा आजारांच्या उपचारासाठी जे बिहारी लोक जातात त्यांच्या सोयीसाठी हे भवन बनवले जात आहे. अनेक राज्यांत अशी भवनं आहेत आणि महाराष्ट्रातही बनणार. ते थांबवायची कोणाची ताकद नाही,’ असे तारे चौधरी यांनी तोडले.

नितीश सरकारच्या निर्णयाला त्यांच्याच राज्यात विरोध

मुंबईतील बिहार भवनला खुद्द बिहारमध्येही विरोध होत आहे. राष्ट्रीय जनता दलाने भाजप-जेडीयू सरकारला सुनावले आहे. ‘नितीश कुमार सरकारचा प्राधान्यक्रमच चुकला आहे. जितके पैसे मुंबईतील भवनासाठी वापरले जाणार आहेत, तेवढय़ा पैशात बिहारमध्ये अत्याधुनिक रुग्णालय उभारता आले असते. त्यामुळे हजारो लोकांचा जीव वाचला असता,’ असे राजद खासदार सुधाकर सिंह म्हणाले.