
डोंबिवलीत स्टेशन परिसरात खाद्यपदार्थांचा स्टॉल लावणाऱ्या एका मराठी तरुणीला त्रास दिला जात असल्याचा व तिच्या स्टॉलवर कारवाई झाल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला. या व्हिडीओमुळे वादाची ठिणगी पडली आहे. मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी लगेचच या तरुणीची भेट घेत तिला धीर दिला.
‘डोंबिवली स्टेशन परिसरात अनेक परप्रांतीय फेरीवाले व्यवसाय करतात, मात्र केडीएमसीकडून माझ्याच स्टॉलवर कारवाई केली जाते. दररोज 300 रुपये हप्ता देऊनही पोलीस आणि केडीएमसी कर्मचारी येऊन त्रास देतात. गाडी उचलून नेतात. इतर फेरीवाल्यांचाही जाच होतो, अशी तक्रार या तरुणीने व्हिडीओद्वारे केली होती. तिच्या या व्हिडीओनंतर मनसेच्या पदाधिकाऱयांनी भेट घेऊन तिची व्यथा जाणून घेतली. तसेच व्यवसाय सुरू ठेव. त्यासाठी कोणतीही मदत लागली तर करू, असे आश्वासनही त्यांनी दिले.

























































