
झोपडपट्टी पुनर्वसन योजनेंतर्गत खोपट येथे बांधलेल्या ब्राह्मणदेव सोसायटीतील रहिवाशांना नरकयातना सहन कराव्या लागत आहेत. १३ मजली इमारतीमधील काही घरांना गळती लागली असून विकासकाने पाण्याचे बिल थकवले आहे. फायर मीटरदेखील अद्यापि बसवलेले नाही. दोनपैकी एक लिफ्ट बंद असल्याने रहिवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो. या सोसायटीमधील गैरसोयींबाबत नागरिकांनी झोपू प्राधिकरण अधिकाऱ्यांकडे अनेकदा लेखी तक्रारी केल्या. पण त्याकडे सपशेल दुर्लक्ष करण्यात आले आहे. विकासकाच्या आस्ते कदम कारभारामुळे रहिवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत असल्याने आता दाद तरी कुणाकडे मागायची, असा सवाल त्यांनी विचारला आहे.
खोपट येथे ब्राह्मणदेव को-ऑप. हौसिंग सोसायटीअंतर्गत तीन चाळी होत्या. ही घरे मोडकळीस आल्याने झोपू योजनेंतर्गत त्याचा पुनर्विकास करण्यात आला. सोसायटीमध्ये एकूण ४३ कुटुंबे राहात होती. सर्व कायदेशीर बाबी पूर्ण केल्यानंतर सुरेश म्हात्रे या विकासकाच्या सनराईज एण्टरप्रायजेसमार्फत १६ जानेवारी २०१६ रोजी पुनर्विकासाचा प्रारंभझाला. तीन वर्षांत इमारत बांधण्याचे निश्चित झाले असतानाही प्रत्यक्षात इमारत उभी राहण्यास ९ वर्षे लागली. त्यामुळे रहिवाशांना अनेक गैरसोयींचा सामना करावा लागला.
गेल्या ९ वर्षांत सोसायटीतील ४० कुटुंबांनी प्रचंड त्रास सहन केला. नव्या घरात चांगल्या सुविधा मिळतील अशी अपेक्षा होती. पण प्रत्यक्षात आमचा भ्रमनिरास झाला आहे. झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना लेखी निवेदने दिली. पण त्याचे उत्तरदेखील अजूनपर्यंत मिळाले नाही. या संपूर्ण गैरकारभारास जबाबदार कोण?
राजेंद्र वाळंज (रहिवासी)
डिसेंबर २४ मध्ये तेरा मजल्याची टोलेजंग इमारत सर्व अडचणींचा सामना करत अखेर उभी राहिली. ४० कुटुंबांना तेथे ताबा देण्यात आला आहे.
इमारतीमध्ये दोन लिफ्ट उभारण्याचे आश्वासन देण्यात आले होते. पण विकासकाने फक्त एकच लिफ्ट उभारली. दुसरी लिफ्ट अद्यापि का सुरू झाली नाही, असा सवाल विकासकाला रहिवाशांनी विचारला आहे.
करारानुसार जनरेटर बसवण्यात येणार होते. पण त्याचाही पत्ता नाही. फायरचे मीटर बसवले नसल्याची लेखी तक्रार संबंधित अधिकाऱ्यांकडे करण्यात आली. पण त्याकडे लक्ष देण्यात आलेले नाही.
या आहेत प्रमुख मागण्या
विकासकाने थकवलेले दोन महिन्यांचे भाडे त्वरित द्यावे.
दहा टक्के वाढीव रकमेचा परतावादेखील मिळावा.
पाण्याचे थकवलेले सुमारे ६५ हजार रुपयांचे बिल विकासकाने भरावे.
दहा ते बारा घरांमध्ये सुरू असलेले लिकेज त्वरित थांबवण्यात यावे.
दुसरी लिफ्ट बसवावी.
ओसी त्वरित द्यावी.

























































