
आयसीसी टी-२० वर्ल्ड कपसारख्या महत्त्वाच्या स्पर्धेआधी द्विपक्षीय क्रिकेट मालिका उभय संघांसाठी रणनीती पक्की करण्याची आणि योग्य संयोजन ठरवण्याची उत्तम संधी ठरते. अनेकदा निकाल दुय्यम ठरतो. मात्र, बहुराष्ट्रीय स्पर्धेआधी आत्मविश्वास वाढवणारा मालिकाविजय मिळण्यासारखे दुसरे काहीच नसते. हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून टीम इंडिया आज गुवाहाटीच्या एसीए स्टेडियमवर न्यूझीलंडविरुद्ध तिसऱ्या टी-२० सामन्यात उतरणार आहे. दुसरीकडे एकदिवसीय मालिका जिंकून इतिहास घडविणाऱ्या पाहुण्या संघासाठी पाच सामन्यांच्या या टी-२० मालिकेत आता अस्तित्वाची लढाई असेल.
नागपूर आणि रायपूर येथे दणदणीत विजय मिळवत सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील हिंदुस्थानी संघाने मालिकेत २-० अशी महत्त्वपूर्ण आघाडी घेतली आहे. सर्वोत्तम फॉर्मात असलेली ‘मेन इन ब्ल्यू’ने आता विजयाच्या हॅट्रिकसह मालिकाविजयाचा निर्धार केला आहे. अलीकडे यजमानांसाठी चिंतेचा विषय ठरलेला सूर्यकुमार यादवचा फॉर्मही उंचावलेला दिसतो.
२०२४ च्या उत्तरार्धानंतर अर्धशतक न झळकावणाऱ्या ३५ वर्षीय सूर्यकुमारने नागपूरमध्ये ३२ धावा केल्या, तर रायपूरमध्ये अविजित ८२ धावांची झंझावाती खेळी करत २०९ धावांचे लक्ष्य अवघ्या १६ षटकांत गाठून दिले. दोन वर्षांनंतर संघात पुनरागमन करणाऱ्या इशान किशनची रायपूरमधील ३२ चेंडूंत ७६ धावांची खेळी व्यवस्थापनाला समाधान देणारी ठरली. गोलंदाजीच्या आघाडीवर, दुसऱ्या सामन्यात अर्शदीप सिंगचा दिवस विसरण्याजोगा ठरला असला, तरी जसप्रीत बुमराविना उतरलेल्या उर्वरित आक्रमणाने मधल्या षटकांत प्रभावी नियंत्रण राखत किवींना मर्यादित धावसंख्येत रोखले.
मात्र पाहुण्या न्यूझीलंडसमोर काही प्रश्न उभे आहेत. सलामीवीर डेव्हॉन कॉन्वे उपखंडात अपेक्षित कामगिरी करू शकलेला नाही आणि त्याला पुढे यावे लागेल. तसेच गोलंदाजांना दोन्ही सामन्यांत चांगलाच मार खावा लागला असून, हिंदुस्थानी फलंदाजांना रोखण्यासाठी नव्या योजना आखाव्या लागतील. दोन महिन्यांपूर्वी याच मैदानावर टीम इंडियाला कसोटी क्रिकेटमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध धावांच्या फरकाने सर्वात मोठा पराभव पत्करावा लागला होता. आता रविवारी, गौतम गंभीर यांच्या मार्गदर्शनाखालील हिंदुस्थानी संघाला सलग नववी द्विपक्षीय टी-२० मालिका जिंकण्याचा आणि जागतिक स्पर्धेआधी रणशिंग फुंकण्याची संधी आहे.

























































