
चंद्रपूर जिल्ह्यात सिंदेवाही तालुक्यात लोहार डोंगरी गावाजवळ प्रस्तावित लोह खाण वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. लोहार डोंगरी इथे अतिशय घनदाट जंगलात असलेल्या टेकड्यांवर लोह खनिज आढळून आल्यानंतर त्याचे उत्खनन करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मात्र, ही खाण इथे झाल्यास वन्यजीवन प्रभावित होईल आणि वाघ मानव संघर्ष तीव्र होईल, असे पर्यावरणवाद्यांचे मत आहे. या खाणीला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे, मनेका गांधी यांनीही विरोध केलाय.
लोहार डोंगरी गावाचा परिसर हा निबीड अरण्याने व्यापला असून, ताडोबाच्या बफर झोनलगत आहे. वाघांच्या आवागमनाचा हा प्रमुख मार्ग आहे. लोहार डोंगरी या गावात वाघ रोज येतो. शिवाय बिबटे आणि इतरही वन्यजीव मोठ्या प्रमाणात आहेत. अशा परिस्थितीत 32 हजार झाडे कापून, वाघांचा मार्ग बंद करून ही खाण होणार असेल, तर त्यास सर्वांनीच विरोध केला पाहिजे, अशी भूमिका इको प्रो. अध्यक्ष बंडू धोत्रे यांनी मांडली आहे. या लोह खाणीला राज्य वन्यजीव अभ्यास मंडळाने मंजुरी दिली आहे. या मंडळाचे अध्यक्ष हे मुख्यमंत्री असतात. मंडळाच्या मंजुरीनंतर हा प्रस्ताव आता केंद्राकडे पाठवला जाणार आहे. तिथे यावर काय निर्णय घेतला जातो, हे बघणे महत्वाचे आहे.
स्थानिकांनी यावर संमिश्र प्रतिक्रिया दिल्या. कुणाला रोजगार हवा, तर कुणाला यात कंपनीचा फायदा दिसतो. लोहार डोंगरी हे गाव विजय वडेट्टीवार यांच्या ब्रम्हपुरी मतदारसंघात येते. यावर वडेट्टीवारांची भूमिका ही खाणीच्या बाजूने आहे. वाघाचा कॉरिडॉर बदलता येऊ शकतो, पर्यायी कॉरिडॉर तयार करता येऊ शकतो. त्यामुळे रोजगार निर्माण करणाऱ्या प्रकल्पाला मी विरोध करणार नाही, अशी त्यांची भूमिका आहे. या खाणीसाठी प्राणीविश्व, संपन्न निसर्ग नष्ट करायचा की लोकांना रोजगार देऊन त्यांचे जीवनमान उंचवायचे, याचा विचार सर्वांनीच करण्याची गरज निर्माण झाली आहे.

























































