संविधान आम्हालाही कळतं, पण फक्त मुंबईवरच आक्रमण का? संजय राऊत यांचा संतप्त सवाल

महाराष्ट्रात बिहार भवन उभारण्यात येत आहे, त्यांनी मुंबईत बिहार भवन उभारावे, तसेच महाराष्ट्र भवनसाठी आम्हाला पाटण्यात जागा द्यावी, ही सांस्कृतीक देवाण-घेवाण असून दोन्ही बाजूंनी ती असायला हवी, असे स्पष्ट मत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले. तसेच त्यांनी बिहारच्या मंत्र्यांनी यावर बोलताना संयम बाळगावा आणि सौम्य भाषा वापरावी. विनाकारण वातावरण बिघडवू नये, असा सल्लाही दिला आहे.

बिहारमधील मंत्री अशोक चौधरी यांनी आव्हानाची भाषा केली आहे. मुंबईत बिहार भवन उभारणारच, ताकद असेल तर ते रोखून दाखवा, अशी आव्हानाची भाषा त्यांनी केली आहे. हा देश सर्वांचा आहे, आपल्या संविधानाने प्रत्येकाला देशांतर्गत कुठेही फिरण्याचे, काम करण्याचे, राहण्याचे अधिकार दिले आहे. हे संविधान आम्हालाही माहिती आहे. आता बिहारच्या मंत्र्यांची भाषा त्यांना संयमित आणि सौम्य शब्दांत वापरता आली असती.

त्यांना मुंबईत बिहार भवन का बांधायचे आहे? बिहारचा, पाटण्याचा विकास करावा, असे त्यांना वात नाही काय? मुंबईत येणारे, इथे राहणारे बिहारी यांची संख्या जास्त झाल्याने त्यांना मुंबईत बिहार भवन बांधावे, असे वाटते. इतर राज्यातील भवनही मुंबई, नवी मुंबईत उभारली गेली आहेत. मुंबई किवा परिसरात बिहार भवन उभारण्यासाठी त्यांना जमीन द्यावी लागेल, ते जमीन तर पाटण्याहून आणू शकत नाही. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वपक्षीय बैठक घेत याची माहिती द्यावी, मुंबईत बिहार भवन उभारण्यासाठी जागा देण्याबाबत निर्णय घ्यावा, तसेच या जागेच्या बदल्यात बिहार सरकारकडे पाटण्यात महाराष्ट्र भवन उभारण्यासाठी पाच एकर जागेची मागणी करावी, असेही संजय राऊत म्हणाले.

महारा्ट्रातील अनेक लोकं बिहारमध्ये जातात. गया, पाटणा येथे आपले अनेकजण जातात. आम्हालांही पाटण्यात 30 माळ्यांचे महाराष्ट्र भवन उभारण्याची संधी मिळावी. ही सांस्कृतीक देवाण- घेवाण आहे, असे आपण मानतो. इथे बिहार भवन उभारताना आमच्या मराठी माणसांना तुम्ही बिहारमध्ये स्वीकारले पाहिजे. ही सांस्कृती देवाण-घेवाण देशता सर्वत्र असायला हवी. फक्त मुंबईवरच आक्रमण का? असा सवाल त्यांनी केला.

मुंबईत जागा हवी असेल तर गौतम अदानीकडून बाजारभावाने, एफआयआरसह घ्यावी. सरकारकडून हवी असेल तर सरकारने त्या बदल्यात बिहार सरकारकडे पाच ते सहा एकर जागा पाटण्यामध्ये गोला रोड, बेली रोड, न्यू पाटलीपुत्र कॉलनी या चांगल्या वस्त्यांमध्ये महाराष्ट्र भवन बांधण्यासाठी मागून घ्यावी. आम्ही देशाचे संविधान मानणारे लोकं आहोत. आम्ही चौधरी यांच्यासारखे आकांडतांडव करणारे नाही. मात्र, त्यांनी मुंबईची परिस्थिती समजून घेतली पाहिजे. विनाकारण वातावरण बिघडेल, असी वक्तव्ये त्यांनी टाळण्याची गरज आहे, असे ते म्हणाले.

बिहारी येथे पोट भरायला येतात, असे वक्तव्य मिंधे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी केले होते. त्याबाबत विचारले असता संजय राऊत म्हणाले की, ते नकली शिवसेनेचे मंत्री आहेत, त्यामुळे ते अशी भाषा वापरत आहेत. मुंबईसह महाराष्ट हा मराठी मजूर, श्रमिक, कामगार यांनी घडवला आहे. मराठी माणसाने आपल्या घामातून, रक्तातून ही मुंबई उभी केली आहे. त्यावर कोणालाही सहज डल्ला मारता येणार नाही. सध्या सर्वच डुप्लिकेट असल्याने त्या नकली लोकांचे विचारही तसेच डुप्लिकेट आहे. त्यामुळे शहरातील मराठी माणसांनी मराठीचा आवाज असलेल्या आपल्या शिवसेनेला भरभरून मतं दिली आहेत, असे ते म्हणाले.

या मंत्र्यांनी ही भूमिका मांडली आहे ती त्यांचे राज्याचे प्रमुख मिंधे यांना मान्य आहे काय? या गटाचे देशातील प्रमुख अमिश शहा आहेत. मराठी तरुण आळशी आहे, मराठी माणूस काम करत नाही, हे मिंधे यांना मान्य आहे काय? याचे त्यांनी उत्तर द्यावे. मराठी माणसांनी ही मुंबई उभी केली आहे. मराठी माणसांचा असा अपमान करू नका, असेही त्यांनी ठणकावले.