राजदमध्ये नव्या युगाचा प्रारंभ; तेजस्वी यादव यांची राष्ट्रीय कार्याध्यक्षपदी नियुक्ती, लालू प्रसाद यादव यांची घोषणा

बिहारच्या राजकारणातून मोठी बातमी येत असून तेजस्वी यादव यांची राष्ट्रीय जनता दलाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पाटणा येथील हॉटेल मौर्य येथे आयोजित राष्ट्रीय जनता दलाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत लालू प्रसाद यादव यांनी ही घोषणा केली. तेजस्वी यादव यांची पक्षाच्या पहिल्या राष्ट्रीय कार्याध्यक्षपदी सर्वसंमतीने निवड करण्यात आली आहे.

बिहारमध्ये गतवर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये आरजेडीला पराभवाचा सामना करावा लागला होता. तेव्हापासून पक्षामध्ये बदलाचे संकेत मिळत होते. याची सुरुवात झाली असून रविवारी हॉटेल मौर्य येथे आरजेडीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या महत्त्वपूर्ण बैठकीला आरजेडी प्रमुख लालू प्रसाद यादव, माजी मुख्यमंत्री राबडी देवी, राज्यसभा खासदार मिसा भारती, संजय यादव आणि देशभरातील 27 राज्यांचे प्रदेशाध्यक्ष, तसेच ज्येष्ठ नेते उपस्थित होते.

बैठकीत ज्येष्ठ नेते भोला यादव यांनी तेजस्वी यांना कार्यकारी अध्यक्ष करण्याचा प्रस्ताव मांडला. या प्रस्तावाला राबडी देवी, मिसा भारती आणि उपस्थित सर्व नेत्यांनी टाळ्यांच्या कडकडाटात पाठिंबा दिला. तेजस्वी यादव यांची राष्ट्रीय कार्याध्यक्षपदी नियुक्ती करण्याचा निर्णय सर्वसंमतीने घेण्यात आला. आरजेडीने आपल्या अधिकृत एक्स अकाऊंटवरून याबाबत माहिती दिली आहे. एका नव्या युगाचा प्रारंभ होत असल्याचे कॅप्शन आरजेडीने दिले आहे.

दरम्यान, राष्ट्रीय जनता दलाच्या स्थापनेनंतर पक्षाच्या इतिहासात पहिल्यांदाच राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष हे पद निर्माण करण्यात आले आहे. आतापर्यंत लालू प्रसाद यादव हेच पक्षाचे सर्वेसर्वा होते. लालू हेच पक्षाचे अध्यक्ष राहतील, मात्र निर्णयाचे सर्व अधिकार तेजस्वी यादव यांच्याकडे असणार आहेत. पक्षाचे सर्व मोठे आणि धोरणात्मक निर्णय आता तेजस्वी यादवच घेतील, असे लालू यादव यांनी स्वत: स्पष्ट केले.