
चंद्रपुरातील शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि बहुजन वंचित युतीच्या आठ निवनिर्वाचित नगरसेवकांसह दोन अपक्षांनी मातोश्रीवर जात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी शिवसेना नेते, खासदार संजय राऊत उपस्थित होते. आपल्याला जो पक्ष सन्मानाने सहकार्य करेल, अशा पक्षासोबत सत्ता स्थापन करा आणि स्थानिक पातळीवर तुम्ही निर्णय घ्या, असा सल्ला उद्धव ठाकरे यांनी नगरसेवकांना दिला आहे. चंद्रपुरात एकाही पक्षाला बहुमत नसल्याने शिवसेनेला (उद्धव बाळासाहेब ठाकरे) चंद्रपुरात महत्व प्राप्त झाले आहे.
चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीत शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) 6 नगरसेवक, वंचित बहुजन आघाडीचे 2 नगरसेवक असे या आघाडीचे 8 नगरसेवक निवडून आले आहेत. चंद्रपुरात सत्तास्थापनेसाठी शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडी या युतीचा निर्णय महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

























































