
पश्चिम बंगालमधील बेहाला परिसरातील साखेर बाजार येथे रविवारी तृणमूल काँग्रेस (TMC) आणि भाजप समर्थकांमध्ये जोरदार राडा झाला. राजकीय कार्यक्रमाचे झेंडे लावण्यावरून सुरू झालेल्या या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. दोन्ही बाजूचा जमाव हिंसक झाला. यावेळी संतप्त जमावाने जाहीर सभेसाठी उभारलेला तात्पुरता मंच पेटवून दिला, तसेच स्थानिक नगरसेवकाच्या कार्यालयाचीही तोडफोड केली.
त्रिपुराचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे निवडणूक सह-प्रभारी बिप्लव कुमार देव यांनी दुपारी बेहाला पश्चिम येथे ‘परिवर्तन संकल्प सभे’ला संबोधित केले. भाजपचा आरोप आहे की, बिप्लव देव कार्यक्रमस्थळावरून निघून गेल्यानंतर तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी सभामंडपात घुसून तोडफोड केली आणि मंचाला आग लावली. दुसरीकडे, या घटनेनंतर संतप्त भाजप कार्यकर्त्यांनी तृणमूलचे स्थानिक नगरसेवक सुदीप पॉले यांच्या कार्यालयावर हल्ला करत तोडफोड केल्याचा आरोप होत आहे.
राजकीय आरोप-प्रत्यारोप
भाजपचे दक्षिण कोलकाता जिल्हा अध्यक्ष अनुपम भट्टाचार्य यांनी सांगितले की, ‘आम्ही सभेसाठी रीतसर परवानगी घेतली होती. मात्र, तृणमूलने सुरुवातीपासूनच पक्षाचे झेंडे लावण्यास विरोध करून मुद्दाम हिंसाचार घडवून आणला.’
तृणमूल काँग्रेसचे उत्तर
घटनेची माहिती मिळताच तृणमूलचे आमदार देबाशिष कुमार आणि रत्ना चॅटर्जी घटनास्थळी पोहोचले. रत्ना चॅटर्जी म्हणाल्या की, ‘भाजप समर्थक एका बॅडमिंटन स्पर्धेत अडथळा आणण्याचा प्रयत्न करत होते. भाजपला माहित नाही की आमच्या पाठीशी ममता बॅनर्जी आहेत. ते आमच्यावर जेवढे हल्ले करतील, तेवढेच आम्ही अधिक ताकदवान होऊ.’
सध्या या परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून परिस्थिती नियंत्रणात असल्याचे सांगण्यात येत आहे.
























































