साताऱ्यातील ड्रग्सचा पैसा महाराष्ट्राच्या निवडणुकीत खेळवला जातोय, सूत्रधार कोण हे फडणवीसांनी शोधावं; संजय राऊत यांचे आव्हान

सातारा जिल्ह्यात पुन्हा एकदा साडे सहा हजार कोटी रुपयांचे ड्रग्स सापडले आहे. यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी महायुती सरकारवर हल्ला चढवला आहे. साताऱ्यातील ड्रग्सचा पैसा महाराष्ट्राच्या निवडणुकीत खेळवला जातोय, सूत्रधार कोण हे फडणवीसांनी शोधावं असे आव्हान यावेळी राऊत यांनी दिले. सोमवारी सकाळी ते माध्यमांशी बोलत होते.

संजय राऊत म्हणाले, साताऱ्यात ड्रग्स का सापडतंय हा प्रश्न शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी उपस्थित केलेला आहे. साताऱ्यात हजारो कोटींचे ड्रग्स सातत्याने सापडत आहे. महाराष्ट्राच्या निवडणुकीत ड्रग्सचा पैसा खेळवला जातो. याचे सूत्रधार कोण हे पोलिसांनी शोधले पाहिजे. मुंबईचे पोलीस जातात पहिली कारवाई करतात. गुजरातचे पोलीस येतात आणि दुसरी कारवाई करतात. साताऱ्याचे पोलीस दल झोपा काढतंय का? एक कारखाना पकडला, पण काही भूमिगत कारखाने चालू आहेत का? कुणा शासकिय व्यक्तीच्या घरातून, शेतातून कारभार चालला आहे का? असा सवाल संजय राऊत यांनी केला.

ते पुढे म्हणाले की, ज्या पद्धतीने महाराष्ट्राच्या राजकारणात हा पैसा येतोय, हा अंमली पदार्थांच्या व्यापाराचा पैसा आहे. त्याशिवाय इतक्या प्रचंड प्रमाणात पैशाचा वापर होऊ शकत नाही आणि या पैशाचे सूत्रधार कोण हे फडणवीस यांनी शोधायला पाहिजे. ठाण्यातील निवडणुकीत सुद्धा साताऱ्यातील ड्रग्सचा पैसा मोठ्या प्रमाणात आला. त्या पैशाच्या ताकदीवर आणि दहशतीच्या बळावर ठाण्यात शिंदे गटाने बहुमत मिळवले. गणेश नाईक गेले सातत्याने काही दिवस भूमिका मांडताहेत. ती अमान्य करता येणार नाही.

साताऱ्यात पुन्हा सापडलेल्या ६,५०० कोटींच्या ड्रग्सवरून सुषमा अंधारे यांचा गृहमंत्र्यांवर निशाणा, कठोर पावले उचलणार की फक्त दबाव तंत्र?

डोंबिवलीमध्ये शिवसेनेचे नगरसेवक हरवले आहेत अशी पोस्टर लावण्यात आली आहे. याला एका नगरसेवकाच्या वडिलांनी आक्षेप घेत बदनामी होत असल्याचे म्हटले. याचा संजय राऊत यांनी समाचार घेतला. ते म्हणाले, कसली बदनामी? आम्ही मुलगा हरवला म्हणत नाही. आमचे नगरसेवक हरवले आहेत. मुलगा तुमचा असेल, आमचे नगरसेवक बेपत्ता आहेत. जे मशाल चिन्हावर जिंकले आणि तेव्हापासून लापता आहे. लापता लेडीज नावाचा सिनेमा होता, तसे हे लापता जेन्टस कुठे आहेत? लापता कार्पोरेटर्स कुठे मिसळले, हरवलेत, अदृश्य झालेत की वेषांतर करून फिरताहेत पाहावे लागेल, असा टोला संजय राऊत यांनी लगावला.

शिवसेनेचे नगरसेवक हरवले; कल्याणमध्ये झळकले पोस्टर्स

हिरव्या रंगावरून सुरू असलेल्या राजकारणावरही संजय राऊत यांनी भाष्य केले. हिरव्याचा विषय हा भाजपचा जुना धंदा आहे. हिरवा रंग कुणाच्या मालकीचा नाही. हिरवा रंग म्हणजे निसर्ग आहे. हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जुनी वक्तव्य पाहिली तर त्यांनीही सांगितले आहे की, हिरवा रंग म्हणजे कुणाच्या मालकीचा, कुणाच्या बापाचा नाही. हिरव्या रंगावर कुणाची मालकी नाही हे बाळासाहेबांनी सांगितलेले आहे. महाराष्ट्र हिरवा करून दाखवू म्हणतात, पण महाराष्ट्रात कृषी क्षेत्रातील हरितक्रांती झालेली आहे. महाराष्ट्र हिरवाच आहे. त्याच्यामुळे तुमचा हिरवा रंग जो म्हणताय राजकीय त्याच्याशी आम्ही सहमत नाही. तुमच्या विचारांची, भूमिकेशी आम्ही अजिबात सहमत नाही. आम्ही राजकीय मैदानात तुमचा पराभव करत राहू. हिरव्या रंगावर फक्त मुस्लिमांचा अधिकार आहे का? तर अजिबात नाही. हिरवा रंग हा निसर्गाचा रंग आहे, त्याच्यावर सगळ्यांचाच अधिकार आहे.

आम्ही जेव्हा म्हणतो भगवा फडकवणार, संपूर्ण महाराष्ट्र भगवा करू. याचा अर्थ छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार आम्ही महाराष्ट्र पसरवू आणि शिवाजी महाजारांनी जी भगवा पताका महाराष्ट्रावर फडकवली ती आम्ही कायम ठेवू. महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांचा जो भगवा रंग आहे त्याचा सुद्धा धर्माशी संबंध जोडत नाही. तो हिंदवी स्वराज्याचे प्रतिक आहे. आम्ही म्हणतो मुंबई, महाराष्ट्र, लाल किल्ल्यावर भगवा फडकू आणि फडकवायलाच पाहिजे. त्याच्याबरोबर जे इतर रंग आहेत हिरवा, लाल, पिवळा, निळा हे सगळे रंग एकत्र येऊन हा देश निर्माण झाला आहे, असेही राऊत म्हणाले.

“शांततेचा संदेश देऊन बांगलादेशातील हिंदूंच्या हत्या थांबतील की इंदिरा गांधींनी ज्या प्रकारे…”, संजय राऊत यांनी सुनावले