Union Budget Session – VB-G RAM-G कायद्यावर चर्चा करण्यास सरकारचा नकार; सर्वपक्षीय बैठकीत SIR, परराष्ट्र धोरणासह विरोधकांनी उपस्थित केले अनेक प्रश्न

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी सरकारने आज कायदेविषयक आणि इतर अजेंड्यावर चर्चा करण्यासाठी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. केंद्रीय संरक्षणमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला ३५ हून अधिक राजकीय पक्षांचे खासदार उपस्थित होते. अर्थसंकल्पीय अधिवेशन २८ जानेवारी रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या लोकसभा आणि राज्यसभेच्या संयुक्त बैठकीला संबोधित करून सुरू होईल. केंद्रीय अर्थसंकल्प १ फेब्रुवारी म्हणजेच रविवारी सादर केला जाईल.

या बैठकीत विरोधी पक्षातील खासदारांनी एसआयआर, परराष्ट्र धोरणा आणि बेरोजगारीसह अनेक मुद्दे उपस्थित केले. या बैठकीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार अरविंद सावंत हे देखील उपस्थित होते. बैठकीनंतर माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधताना ते म्हणाले आहेत की, “बैठकीत प्रत्येक पक्षाने आपापल्या राज्यांनुसार आपापल्या मागण्या केल्या आहेत. प्रदूषण, एसआयआर, वाढती बेरोजगारी सारखे अनेक मुद्दे मांडण्यात आले.”

तर आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह म्हणाले की, “मी सरकारच्या परराष्ट्र धोरणातील पूर्ण अपयशाचा मुद्दा उपस्थित केला, मग तो बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचार असोत किंवा अमेरिकेकडून पंतप्रधानांचा सतत होणारा अपमान असो. या सर्व मुद्द्यांवर मौन बाळगल्याने देशात चिंता निर्माण होत आहे. मी शंकराचार्यांचा मुद्दाही उपस्थित केला, प्रयागराजमध्ये त्यांचा कसा अपमान झाला.”