गिरगावात स्कूल बसच्या धडकेत चिमुकल्याचा मृत्यू

शाळेतून बसने आलेल्या नातीला घ्यायला गेलेल्या आजीसोबत आज वाईट घटना घडली. नात ज्या स्कूल बसमधून आली त्याच बसने आजीला धडक दिली. त्यात आजीला गंभीर दुखापत झाली. तर एक वर्षाच्या नातवाचा दुर्दैवी मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी चालक संभाजी वाखारे (46) याला अटक केली. खेतवाडी निर्मल निकेतन इमारतीसमोर चंद्रकला व्यास (63) या स्कूल बसने आलेल्या आपल्या नातीला घेण्याकरिता गेल्या होत्या. त्यांच्या कडेवर नातू अवीर व्यास (1) हादेखील होता. नातीला घेऊन त्या बसच्या समोरून रस्ता ओलांडत असताना चालकाने स्कूल बस पुढे घेतली. या धडकेत चंद्रकला व अवीर यांना गंभीर दुखापत झाली.