
अजित पवार यांचे आज निधन झाले, पण एकही सरकारी फाईल त्यांच्याकडे प्रलंबित नाही. मंगळवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीला ते उपस्थित होते. बैठकीनंतर त्यांनी आपल्या टेबलवरील सर्व फाईल्स क्लिअर केल्या. त्यानंतर पूर्वनियोजित बैठका घेऊन पुढच्या प्रवासाला निघाले.
अजित पवार यांचा दिनक्रम पहाटेच सुरू व्हायचा. ते वेळेचे पक्के होते. पहाटेपासूनच ते कामाला सुरुवात करायचे. त्यावेळी संबंधित अधिकारी वेळेवर पोहोचले नाही तर त्यांना दादांच्या संतापाला सामोरे जावे लागायचे. मुंबईत असले की अजितदादा सकाळी साडेआठ वाजताच मंत्रालयात पोहोचून कामाला सुरुवात करायचे.
मंगळवारी मंत्रिमंडळाची बैठक दुपारी होती, पण दादा सकाळी साडेआठ वाजताच मंत्रालयात उपस्थित होते. येताच त्यांनी सर्व प्रलंबित फाईल्स क्लिअर केल्या. त्यानंतर चालू आर्थिक वर्षात राज्याला किती उत्पन्न मिळाले त्याचा आढावा त्यांनी वित्त सचिव, महसूल सचिव, जीएसटी आयुक्तांकडून घेतला. तसेच उत्पन्नवाढीसाठी सूचनाही दिल्या. त्यानंतर आपल्या गटातील मंत्र्यांबरोबर त्यांनी चर्चा करून मंत्रिमंडळ बैठकीला गेले.
मंत्रिमंडळ बैठकीनंतर पायाभूत सुविधा समिती बैठक घेऊन अजितदादा आपल्या दालनात गेले. तिथे मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याबरोबर त्यांची भेट नियोजित होती. त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर ते दुपारी अडीच वाजता ‘देवगिरी’ निवासस्थानाकडे रवाना झाले.





























































