गडचिरोलीच्या आश्रमशाळेतील 60 विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा, दोघांची प्रकृती गंभीर

Food Poisoning in Gadchiroli Ashram School 60 Students Ill, 2 Critical

गडचिरोली जिह्यातील आदिवासी विकास विभागाच्या भामरागड प्रकल्प कार्यालयांतर्गत येणाऱ्या लाहेरी येथील शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळेत बुधवारी अन्नातून विषबाधेचा गंभीर प्रकार घडला. शाळेतील तब्बल 60 विद्यार्थ्यांना उलटय़ा आणि पोटदुखीचा त्रास सुरू झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. यातील 42 विद्यार्थ्यांना भामरागड ग्रामीण रुग्णालयात, तर प्रकृती गंभीर असलेल्या दोन विद्यार्थ्यांना तातडीने अहेरी येथील महिला व बाल रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्रीचे जेवण केल्यानंतर काही विद्यार्थ्यांना अस्वस्थ वाटू लागले होते. मात्र बुधवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास एकामागून एक अशा 60 विद्यार्थ्यांची प्रकृती एकाएकी बिघडली. सर्वांना मळमळ आणि तीव्र पोटदुखीचा त्रास होऊ लागल्याने शाळेतील कर्मचाऱयांची धावपळ उडाली. सुरुवातीला विद्यार्थ्यांना स्थानिक लाहेरी प्राथमिक आरोग्य पेंद्रात नेण्यात आले, परंतु परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता 42 विद्यार्थ्यांना तातडीने भामरागड येथे हलवण्यात आले. अन्नातून विषबाधा झाल्याचा प्राथमिक अंदाज डॉक्टरांनी वर्तविला आहे.

घटनेची माहिती मिळताच भामरागडचे प्रकल्प अधिकारी अमर राऊत, तहसीलदार किशोर बागडे आणि सहाय्यक प्रकल्प अधिकारी रोशन चव्हाण यांनी शाळेत धाव घेतली. आरोग्य विभागाच्या चमूला पाचारण करून उर्वरित विद्यार्थ्यांचीही तपासणी सुरू करण्यात आली आहे. ‘सकाळी 11 वाजेपासून विद्यार्थ्यांना त्रास जाणवू लागल्याने लागलीच उपचार सुरू करण्यात आले. सध्या परिस्थिती नियंत्रणात असून आम्ही पूर्ण लक्ष ठेवून आहोत. या घटनेची सखोल चौकशी करण्यात येईल,’ असे प्रकल्प अधिकारी अमर राऊत यांनी सांगितले.

सहाय्यक प्रकल्प अधिकाऱ्यांनी घेतला आढावा

या आश्रमशाळेत पहिली ते बारावीपर्यंतचे एकूण 300 विद्यार्थी शिक्षण घेतात. हे सर्व विद्यार्थी अतिदुर्गम भागातील आहेत. इतक्या मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याने आश्रमशाळेतील जेवणाच्या दर्जाबाबत आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. प्रकल्प अधिकारी अमर राऊत यांनी दिवसभर लाहेरीतच थांबून परिस्थितीचा आढावा घेतला.

Food Poisoning in Gadchiroli Ashram School: 60 Students Ill, 2 Critical

60 tribal students from Laheri Government Ashram School in Gadchiroli suffered food poisoning. 42 shifted to Bhamragad and 2 in critical condition to Aheri hospital.