
डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाने इस्रायल आणि सौदी अरब या दोन देशांना अब्जावधी डॉलरची शस्त्रास्त्र विक्री करण्याला मंजुरी दिली आहे. या दोन देशांशी यासंबंधी करार झाला असून अमेरिकेने या कराराला मंजुरी दिली आहे. त्यामुळे आता मध्य-पूर्वमध्ये तणाव अधिक गडद झाला आहे. ट्रम्प प्रशासनाने इस्रायलला एकूण 6.67 अब्ज अमेरिकन डॉलर आणि सौदी अरबला 9 अब्ज अमेरिकन डॉलर मूल्यांचे शस्त्रास्त्र विकणार आहे. या दोन्ही देशांसोबत करण्यात आलेला एकूण करार पाहता अमेरिका 15.67 अब्ज डॉलरची शस्त्रे विकणार आहे.
अमेरिकेच्या विदेश विभागाने दिलेल्या माहितीनुसार, या दोन्ही देशांसोबत झालेला जो सौदा आहे. याच्या मंजुरीची माहिती अमेरिकन काँग्रेसला देण्यात आली होती. त्यानंतर याला सार्वजनिक करण्यात आले आहे. अमेरिकेची ही घोषणा अशावेळी आली आहे. ज्यावेळी डोनाल्ड ट्रम्प हे गाझासाठी आपल्या युद्धविरामाची योजना पुढे करत आहेत. याचा उद्देश इस्रायल आणि हमास यांच्यात सुरू असलेला संघर्ष समाप्त करणे आहे. पॅलेस्टिनी क्षेत्राचे पुनर्निर्माण आणि पुनर्विकास करणे आहे. गेल्या दोन वर्षांहून अधिक काळ सुरू असलेल्या युद्धामुळे गाझा पूर्णपणे धुळीस मिळाला आहे. आतापर्यंत यात हजारो लोकांचा मृत्यू झाला असून लाखो लोक बेघर झाले आहेत. इस्रायलसोबत झालेल्या करारामुळे इस्रायलची भविष्यातील सुरक्षा आणखी मजबूत होण्यास मदत होईल. इस्रायलची सुरक्षा त्यांच्या राष्ट्रीय हितासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे, असेही अमेरिकेच्या विदेश विभागाने म्हटले आहे. या सौद्यावर डेमोक्रेटिकच्या काही खासदारांनी आक्षेप घेतला आहे.
सौदीसोबत मोठा सौदा
अमेरिकेकडून सौदी अरबला 730 पॅट्रियट अडवॉन्स्ड कॅपेबिलिटी-3 (पॅक-3) मिसाईल सेगमेंट इन्हान्समेंट मिसाईल आमि संबंधित उपकरणे दिली जातील. याची अंदाजीत किंमत 9 अब्ज डॉलर आहे. हा सौदा अमेरिकेचे विदेशी धोरण आणि राष्ट्रीय सुरक्षा उद्देशाला मजबूत करेल. कारण, यामुळे प्रमुख गैर-नाटो सहकारी देशाची सुरक्षा वाढेल. जो खाडी क्षेत्रातील राजकीय स्थैर्य आणि आर्थिक प्रगतीसाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. हा सौदा सौदी अरबसोबतचा सर्वात मोठा सौदा आहे.
इस्रायलला मिळणार अत्याधुनिक शस्त्रे
इस्रायलसोबत झालेला अमेरिकेचा सौदा हा चार वेगवेगळ्या टप्प्यातील आहे. याचे एकूण मूल्य 6.67 अब्ज डॉलर आहे. या कराराअंतर्गत इस्रायलला 30 एएच-64 ई अपाचे ऍटॅक
हेलिकॉप्टर आणि त्यासंबंधित उपकरण, शस्त्रे, रॉकेट लाँचरचा समावेश आहे. याची किंमत 3.8 अब्ज डॉलरपर्यंत आहे. याशिवाय, 3250 जॉइंट लाइट टेक्टिकल व्हीकल (जेएलटीव्ही) किंवा हलके सामरिक वाहन, याची किंमत 1.98 अब्ज डॉलर आहे. हे वाहने सैन्य आणि लॉजिस्टिकसाठी वापरले जाऊ शकतील. आर्म्ड पर्सनल कॅरियरसाठी पॉवर पॅकही मिळेल. याची किंमत 740 मिलियन डॉलर आहे. 150 मिलियन डॉलरपर्यंत काही हलके युटिलिटी हेलिकॉप्टरही दिले जातील.























































