देश विदेश – देशातील पहिली एलएनजी ट्रेन सज्ज

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशातील पहिली लिक्विफाइड नॅचरल गॅस (एलएनजी) वर चालणारी ट्रेन अहमदाबादला पोहोचली आहे. गुजरातच्या मेहसाणा आणि साबरमती विभागादरम्यान ट्रेनची चाचणी सुरू आहे. या ट्रेनने आतापर्यंत 2 हजार किलोमीटरपेक्षा जास्त अंतर कापले आहे. येत्या काळात या विभागातील आणखी 8 ते 10 ट्रेन्समध्ये एलएनजी तंत्रज्ञान वापरण्याची योजना आहे. एलएनजी डिझेलपेक्षा स्वस्त असल्याने ट्रेन चालवण्याचा एकूण खर्च कमी होतो. एलएनजी इंधनामुळे प्रदूषणातही मोठी घट होते.  यासोबतच, इंधनाच्या खर्चातही बरीच बचत होते.

 तुर्कस्तानदुबई मार्गे अमेरिकेत प्रवेश

अमेरिकेत डंकी मार्गाने प्रवेश करण्याच्या प्रयत्नात गेल्या एका वर्षात दररोज 65 भारतीय पकडले गेले. तुर्कस्तान-दुबई मार्गे अमेरिकेत प्रवेश करण्याचा ट्रेंड वाढला असून जानेवारी ते डिसेंबर 2025 च्या आकडेवारीनुसार, अमेरिकन बॉर्डर अँड कस्टमने एकूण 23 हजार 830 हिंदुस्थानी नागरिकांना पकडले आहे. अमेरिकेत प्रवेश करताना पकडले गेलेले सर्व भारतीय सिंगल एंटिटी म्हणजे एकटेच होते. कोणताही हिंदुस्थानी नागरिक हा कुटुंबासोबत पकडला गेला नाही. तर 2024 मध्ये पकडलेल्या हिंदुस्थानींपैकी जवळपास 20 हजार भाऊ, पत्नी किंवा मुलांसोबत अमेरिकेत बेकायदेशीरपणे प्रवेश करत असताना पकडले गेले.  

बंगळुरूमध्ये पाळीव कुत्र्याचा महिलेवर हल्ला

बंगळुरूमध्ये मॉर्निंगवॉकला गेलेल्या एका महिलेवर पाळीव कुत्र्याने जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात महिला गंभीर जखमी झाली आहे. ही घटना सकाळी सातच्या सुमारास एचएसआर लेआऊटमधील टीचर्स कॉलनीत घडली आहे. महिलेच्या गळ्यावर, चेहऱ्यावर, हातांवर आणि पायांवर या कुत्र्याने चावा घेतला आहे. महिलेला वाचवण्यासाठी आलेल्या एका तरुणावरही या कुत्र्याने हल्ला केला आहे. हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या महिलेला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. महिलेची प्रकृती गंभीर असून तिच्या डोक्यावर 50 हून अधिक टाके पडले आहेत.

बांगलादेशाहून थेट पाकिस्तानला फ्लाईट

बांगलादेशची राजधानी ढाकाहून पाकिस्तानच्या कराचीच्या जिन्ना इंटरनॅशनल एअरपोर्टवर 14 वर्षांनंतर पहिल्यांदा थेट फ्लाईट पोहोचली. या दोन्ही देशांमध्ये हवाई कनेक्टिविटी पुन्हा एकदा सुरू झाली आहे. पाकिस्तान एअरपोर्ट अथोरिटीनुसार, विमान बांगलादेश एअरलाईनची फ्लाईट बीजी-341 ढाक्याहून कराचीला पोहोचली. विमानतळावर या फ्लाईटचे स्वागत पारंपरिक पद्धतीने म्हणजे पाण्याचा फवारा देऊन करण्यात आले. या दोन देशांमध्ये फ्लाईट आठवडय़ात दोन दिवस चालणार आहे. गुरुवार आणि शनिवारी ही फ्लाईट सुरू राहील. ढाक्याहून रात्री 8 वाजता उड्डाण होऊन रात्री 11 वाजता विमान कराचीला पोहोचेल.