राष्ट्रवादी पक्ष एकत्र येण्याच्या मुद्द्याला पटेल आणि तटकरेंकडून बगल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याची घोषणा 12 फेब्रुवारीला होणार होती असे स्पष्ट केले, मात्र अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी याबाबतच्या प्रश्नावर थेट उत्तर देण्याचे टाळत या मुद्दय़ाला बगल दिली आहे. यामुळे अजित पवार गटात संभ्रमाचे वातावरण तयार झाले आहे.

शरद पवार आणि अजित पवार यांच्यातील बैठकीचा व्हायरल होत असलेल्या व्हिडीओबाबत तटकरे म्हणाले, हा व्हिडीओ समोर आला आहे तो बारामती इथं झालेल्या कृषी प्रदर्शनाच्या दिवशीचा आहे. या बैठकीत फक्त जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका एकत्र लढवण्याबाबत चर्चा झाली होती. सदर बैठकीत विलीनीकरणावर चर्चा झाली नसल्याचे तटकरे यांनी सांगितले. दरम्यान विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे आणि मंत्री बाबासाहेब पाटील यांनी मात्र राष्ट्रवादीचं विलीनीकरण व्हावं, अशी अजितदादांची इच्छा होती याबाबत तटकरे आणि पटेल यांनाच माहिती असावी असे सांगितले.

म्हणून पार्थ पवार शपथविधीला गैरहजर

पार्थ पवार यांच्यावर भूखंड घोटाळ्याचा आरोप असून, सध्या त्यासंदर्भात चौकशी सुरू आहे. त्यामुळे ते शपथविधीला हजर राहिल्यास भाजपच्या प्रतिमेला धक्का बसेल म्हणून पार्थ पवार यांना शपथविधी समारंभापासून दूर ठेवल्याची चर्चा आहे.

पार्थ पवार यांनी घेतली शरद पवार यांची भेट

पार्थ पवार यांनी शरद पवार यांची गोविंद बाग येथील निवासस्थानी भेट घेऊन जवळपास 30 ते 35 मिनिटे चर्चा केली. या भेटीनंतर पार्थ पवार यांनी सुनेत्रा पवारांशी फोनवरून चर्चा करत भेटीचा तपशील दिला. पार्थ पवार राज्यसभेवर जाणार असल्याची चर्चा आहे.

सुप्रिया सुळे अजितदादांच्या आईंना भेटल्या

मुंबईत सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीची सर्व प्रक्रिया सुरू असताना सुप्रिया सुळे यांनी अजितदादांच्या बारामतीतील घरी त्यांची आई आशाताईंची भेट घेतली. आशाताईंची विचारपूस केल्यानंतर सुप्रिया सुळे या तातडीने दिल्लीला जाण्यासाठी रवाना झाल्या.