
इंग्लंड आणि श्रीलंका यांच्यामध्ये T20 World Cup 2026 च्या पार्श्वभुमीवर तीन सामन्याची टी-20 मालिका खेळली जात आहे. मालिकेतील पहिला सामना इंग्लंडने आपल्या नावावर केला आणि रविवारी (01 फेब्रुवारी 2026) झालेला दुसरा सामना सुद्ध DLS नियमांनुसार 6 विकेटने जिंकला. या विजयासह इंग्लंडने मालिका सुद्धा 2-0 अशा फरकाने खिशात घातली आहे. हा सामना इंग्लंडचा विस्फोटक फलंदाज जोस बटलरसाठी ऐतिहासिक ठरला असून त्याने एक विक्रम आपल्या नावावर केला आहे.
जोस बटलरने आपल्या आंतरराष्ट्रीय टी-20 कारकिर्दीमध्ये सर्वोत्तम कामगिरी केली आहे. रविवारी झालेला श्रीलंकेविरुद्धचा सामना त्यांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतला 402 वा सामना ठरला आहे. विशेष म्हणजे इंग्लंडकडून 402 आंतरराष्ट्रीय सामने खेळणारा जोस बटलर पहिलाच खेळाडू ठरला आहे. यापूर्वी हा विक्रम वेगवान गोलंदाज जेम्स एँडरसनच्या नावावर होता. त्याने आपल्या कारकिर्दीमध्ये एकूण 401 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. इंग्लंडकडून सर्वाधिक आंतरराष्ट्रीय खेळाडूंच्या यादीमध्ये तिसऱ्या क्रमांकावर जो रूट (384), चौथ्या क्रमांकावर इयॉन मॉर्गन (356) आणि पाचव्या क्रमांकावर स्टुअर्ट ब्रॉड (344) या खेळाडूंचा समावेश आहे.





























































