
चिनी सैन्याने हिंदुस्थानात केलेल्या घुसखोरीवर बोलणारे लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना आज सत्ताधाऱ्यांनी रोखले. त्यामुळे लोकसभेत जोरदार गदारोळ झाला. ‘‘चीनच्या घुसखोरीवर बोलायला मोदी सरकार इतकं का घाबरतंय,’’ असा हल्ला राहुल गांधी यांनी चढवला. त्यामुळे सत्ताधारी अधिकच संतापले. विरोधकांनीही त्यांना प्रत्युत्तर दिल्याने गोंधळ वाढला. अखेर लोकसभेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.
राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बोलताना भाजपचे खासदार तेजस्वी सूर्या यांनी काँग्रेसवर टीका केली होती. विरोधकांच्या देशभक्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. राहुल गांधी यांनी आज अभिभाषणावर बोलताना सूर्या यांच्या टीकेला उत्तर देण्यासाठी माजी लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांच्या ‘फोर स्टार्स ऑफ डेस्टिनी’ या पुस्तकाचा आधार घेतला. कोण देशभक्त आहे आणि कोण नाही हे यातून कळेल, असे म्हणत राहुल यांनी पुस्तकातील तपशील वाचण्यास सुरुवात केली. तिथेच वादाची ठिणगी पडली. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, गृह मंत्री अमित शहा आणि संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी त्यास तीव्र आक्षेप घेतला. जे पुस्तक प्रकाशितच झाले नाही, त्याचा आधार घेऊन सदस्य सभागृहात बोलू शकत नाहीत, असे राजनाथ म्हणाले. शहांनीही त्यास दुजोरा दिला.
मंत्र्यांच्या विरोधानंतर लोकसभा अध्यक्षांनी नियमावर बोट ठेवत राहुल यांना परवानगी नाकारली. ‘‘चीनच्या घुसखोरीचा राष्ट्रपतीच्या अभिभाषणाशी संबंध नाही. विरोधी पक्षनेत्यांनी केवळ विषयावर बोलावे. शिवाय जे पुस्तक प्रकाशित झालेले नाही त्याचा आधार घेऊन आरोप केले जाऊ नयेत. आरोप करायचे असतील तर त्याबाबत पूर्वसूचना द्यावी लागते,’’ असे लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला म्हणाले. मात्र राहुल यांनी आपला मुद्दा लावून धरत ‘कॅराव्हान’ मासिकात आलेला याच पुस्तकातील भाग वाचण्यास सुरुवात केली. त्यासही सत्ताधाऱयांनी आक्षेप घेतला. मासिकात काहीही लिहिलेले असू शकते. नियमानुसार तुम्ही ते वाचू शकत नाही, असे अमित शहा म्हणाले. त्यामुळे अध्यक्षांनी राहुल यांना पुन्हा सूचना केली.
नरवणे कोर्टात का गेले नाहीत? – राजनाथ
नरवणे यांचे पुस्तक प्रकाशित झालेच नसल्याचा मुद्दा सत्ताधाऱयांनी उपस्थित केला. त्यावर या पुस्तकात पंतप्रधान मोदी व राजनाथ सिंह यांचे नाव नसल्याने सरकारने ते प्रकाशित होऊ दिले नसल्याचे राहुल गांधी म्हणाले. त्यावर ‘‘तसे असेल तर नरवणे कोर्टात का गेले नाहीत,’’ अशी विचारणा राजनाथ सिंह यांनी केली.
अध्यक्षजी, तुम्हीच सांगा नेमके काय करू?
पुस्तक आणि मासिकाचा संदर्भ देण्यासही आक्षेप घेतला गेल्याने राहुल गांधी यांनी केवळ हिंदुस्थान-चीनचा मुद्दा उपस्थित करण्याची मागणी केली. मात्र अभिभाषणाशी त्याचा संबंध नाही, असे म्हणत अध्यक्षांनी पुन्हा परवानगी नाकारली. त्यावर राहुल गांधीनी अध्यक्षांनाच मार्गदर्शन करण्याची विनंती केली. पुस्तकाचा उल्लेख करायचा नाही. मासिकातले उतारे वाचून दाखवायचे नाहीत. विषयही उपस्थित करायचा नाही. मग हा मुद्दा मी नेमका मांडू कसा, असा प्रश्न राहुल यांनी केला. त्यावर ‘‘मी तुमचा सल्लागार नाही. पण नियमानुसार तुम्हाला बोलता येणार नाही,’’ असे अध्यक्ष म्हणाले. त्यावरून प्रचंड गदारोळ झाला.
तुम्हाला लोकांपासून सत्य लपवायचे आहे!
राहुल गांधी यांनी शेवटपर्यंत मुद्दा सोडला नाही. तहकुबीनंतर कामकाज सुरू होताच राहुल यांनी पुन्हा तोच मुद्दा उपस्थित केला. ‘‘हा देशाच्या सुरक्षेचा प्रश्न आहे. चिनी सैन्य आपल्यासमोर येऊन उभं ठाकलं होतं. पैलाश पर्वतरांगांपर्यंत आलं होतं,’’ असं राहुल यांनी सांगताच राजनाथ पुन्हा उभे राहिले. त्यांना सत्ताधारी बाकांवरील इतर सदस्यांनी पाठिंबा दिला. अध्यक्षांनी निर्णय दिल्यानंतरही न ऐकणाऱया सदस्यांच्या बाबतीत काहीतरी निर्णय घ्यायला हवा, असे रिजिजू म्हणाले. चीन चाल करून आला तेव्हा काय झाले होते हे लष्करातील प्रत्येकाला माहीत आहे. तुम्ही ते लोकांपासून लपवत आहात. पण सत्य सर्वांना माहीत आहे, असे राहुल म्हणाले. त्यावरूनही गदारोळ झाला. शेवटी दिवसभरासाठी कामकाज तहकूब करण्यात आले.
आम्ही दहशतवादाशी लढतो असं हे लोक सांगतात आणि एका पुस्तकातली चार वाक्यं ऐकायला घाबरतात. यात असं काय आहे की सरकार घाबरतंय? मला ते वाचू दिलं जात नाही. आणि भीती वाटत नसेल तर त्यांनी मला बोलू दिलं पाहिजे. ते इतके का घाबरलेत?

























































