रेल्वेच्या अर्थसंकल्पात ‘गंडवागंडवी’, लोकल प्रवाशांची घोर निराशा; मुंबईतील प्रवासी संघटनांची नाराजी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी रविवारी जाहीर केलेल्या रेल्वे अर्थसंकल्पावर तीव्र नाराजीचा सूर उमटला आहे. रोज 70 लाख लोक प्रवास करीत असलेल्या उपनगरी रेल्वेच्या पायाभूत सुविधा व प्रवासी सुरक्षेच्या दृष्टीने ठोस घोषणा केलेली नाही. अर्थसंकल्पाने लोकल प्रवाशांची घोर निराशा केली, सरकारने दरवर्षीप्रमाणे ‘गंडवागंडवी’ केली, अशी नाराजी मुंबईतील प्रवासी संघटनांनी व्यक्त केली आहे. रोज कोटय़वधीचे उत्पन्न कमावत असतानाही सामान्य प्रवाशांचा लोकल प्रवास सुकर करण्याची मानसिकता सरकारची नसल्याची संतप्त प्रतिक्रिया मुंबईकरांनी दिली आहे.

अर्थमंत्र्यांनी रविवारी अर्थसंकल्प सादर केला. त्यापाठोपाठ दुसऱ्याच दिवशी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी ‘व्हिडिओ
कॉन्फरन्सिंग’च्या माध्यमातून प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यात ‘मुंबईकरांची जीवनवाहिनी’ असणाऱ्या लोकल ट्रेनसाठी काहीच ठोस योजना ऐकायला मिळाल्या नाहीत. जुन्याच घोषणा नव्याने करण्याचा प्रयत्न रेल्वेमंत्र्यांनी केला. त्यावर मुंबईकर, ठाणेकरांसह विविध प्रवासी संघटनांनी नाराजी बोलून दाखवली आहे. उपनगरी रेल्वे मार्गावर दररोज प्रवाशांचे हकनाक बळी जात आहेत. लोकल ट्रेनला होणाऱ्या जीवघेण्या गर्दीचा प्रश्न गंभीर आहे. या पार्श्वभूमीवर ठोस योजनांची घोषणा केली जाईल, अशी अपेक्षा प्रवाशांनी बाळगली होती; परंतु केंद्र सरकारने अपेक्षाभंग करतानाच लोकल प्रवाशांची निव्वळ थट्टा केल्याची संतप्त प्रतिक्रिया मुंबईकर आणि ठाणेकर प्रवाशांनी दिली आहे.

लाखो प्रवाशांच्या जिवाशी थट्टा

केंद्र सरकारने उपनगरी रेल्वेच्या लाखो प्रवाशांच्या जिवाशी थट्टा केली आहे. दरवर्षी शेकडो प्रवासी अपघातात प्राण गमावत असताना प्रवासी सुरक्षा आजही प्रशासनाच्या प्राधान्यक्रमात नाही. अर्थसंकल्पातील बहुतांश पैसा रेल्वे स्थानकांच्या सुशोभीकरणावर खर्च केला जात आहे. सामान्य प्रवाशांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष केले जात आहे. दिल्लीतील अधिकारी मुंबईच्या वास्तवापासून दूर असून रोज होणाऱ्या अपघातांची जबाबदारी घ्यायला तयार नाहीत. त्यांच्या निष्काळजीपणामुळे प्रवाशांचे प्राण जात आहेत. – सिद्धेश देसाई, उपाध्यक्ष, मुंबई रेल प्रवासी संघ

अर्थसंकल्पावर 100 टक्के निराशा

आम्हा प्रवाशांना रोज गर्दीचा सामना करावा लागतोय. यंदाच्या अर्थसंकल्पात लोकल ट्रेनची संख्या वाढवली जाईल अशी अपेक्षा होती. मात्र दरवर्षीप्रमाणे यंदाही रेल्वे प्रवाशांची 100 टक्के निराशा झाली आहे. मध्य रेल्वे मार्गावरील नियमित प्रवाशांच्या वतीने केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पावर नाराजी व्यक्त करीत आहोत. – राजेश घनघाव, अध्यक्ष, कल्याण-कसारा-कर्जत रेल्वे प्रवासी संघटना

संवेदना नसलेले सरकार, राजकारणी

आम्ही दरदिवशी जीव मुठीत घेऊन लोकल प्रवास करतो. लोकल ट्रेनची गर्दी दिवसेंदिवस अत्यंत गंभीर स्वरूप धारण करीत आहे. मुंबईत बाहेरून मोठय़ा प्रमाणावर लोंढे दाखल होत आहेत. ते लोक रोजीरोटीसाठी मुंबई-महाराष्ट्रात येत आहेत. त्यांच्या रोजगाराला आमचा विरोध नाही. मात्र अशा लोंढय़ांचा उपनगरी रेल्वेवर पडणारा ताण सरकारला दिसत नाही हे दुर्दैव आहे. आमच्या लोकल प्रवासात निष्पाप भाऊ, भगिनींचे बळी जात आहेत. प्रवासी सुरक्षेचा प्रश्न गंभीर आहे. मात्र संवेदना नसलेले सरकार, राजकारण्यांना त्यांचे काहीही सोयरसुतक नाही, याचे वाईट वाटतेय. – वंदना सोनवणे, अध्यक्ष, महाराष्ट्र महिला प्रवासी संघटना