
मुंबईतील नागरिकांच्या जीवित संरक्षणाची जबाबदारी पार पाडणाऱ्या मुंबई अग्निशमन दलाच्या बचाव कार्यात अनधिकृत वाहन पार्किंगमुळे अडथळे निर्माण होत असल्याचे वारंवार निदर्शनास येत आहे. या पार्श्वभूमीवर आगीच्या किंवा आपत्तीच्या घटनास्थळी शीघ्र प्रतिसाद देण्यात अडथळा निर्माण झाल्यास संबंधित वाहनमालकांवर पोलीस स्थानकात थेट एफआयआर नोंदविण्यात येणार आहेत.
मुंबई अग्निशमन दल हे मुंबईतील नागरिकांसह प्राणी, पक्ष्यांच्या जीविताचे तसेच वित्ताचे आगीच्या दुर्घटना तसेच अन्य नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्तीपासून संरक्षण करण्याचे कर्तव्य बजावत असते. अग्निशमन व बचाव कार्य प्रभावीपणे राबविण्यासाठी दुर्घटनास्थळी अग्निशमन दलाची सुसज्ज वाहने, प्रगत साधनसामुग्री व कुशल मनुष्यबळ इत्यादींद्वारे शीघ्र प्रतिसाद देण्यासाठी घटनास्थळी धाव घेतात. मात्र मुंबईत रस्त्यांच्याकडेला वाहने अनधिकृतरित्या पार्क केलेली असतात. यामुळे प्रत्यक्ष दुर्घटनास्थळी शीघ्र प्रतिसाद देण्यास किंवा पोहोचण्यासाठी अनेक अडचणी येतात व ते कार्य प्रभावीपणे राबविता न आल्याने जीवित व वित्तहानीचे प्रमाण वाढू शकते. याची पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी प्रखरतेने गंभीर दखल घेतली आहे.



























































