
मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या निकालानंतर अखेर पंधरा दिवसांनी भाजप-शिंदे गटाला गटनोंदणीसाठी मुहूर्त सापडला. मुंबईत महायुती करून लढणाऱ्या भाजप-शिंदे गटाने कोकण विभागीय आयुक्तांकडे आज स्वतंत्र गटनोंदणी केली. त्याआधी महापालिका मुख्यालयात झालेल्या भाजप नगरसेवकांच्या बैठकीत भाजपच्या गटनेतेपदी गणेश खणकर यांची नियुक्ती करण्यात आली, तर शिंदे गटाकडून अमेय घोले यांची गटनेता म्हणून नियुक्ती करण्यात आली.
मुंबई महापलिकेत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालेल्या भाजप आणि शिंदे गटाकडून आपली गटनोंदणी करण्यात आली नव्हती. स्वतंत्र गटनोंदणी करायची की संयुक्त याबाबतचा निर्णय होत नसल्यामुळे ही गटनोंदणी रखडली होती. भाजप-शिंदे गटाची संयुक्त नोंदणी केल्यास पालिकेतील सत्तावाटपात कसा फायदा होईल, विविध समित्यांवर मिळणारे प्रतिनिधित्व याबाबत कायदेशीर सल्लामसलत व चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती, मात्र अखेर या दोन पक्षांनी स्वतःचे स्वतंत्र गट स्थापन केले असून गटनेतेही निवडले आहेत.
25 किंवा 26 फेब्रुवारीला अर्थसंकल्प
महापौर निवडीचा सोपस्कर पार पाडला जाईल. त्यानंतर 18 फेब्रुवारी रोजी पालिकेची विशेष सभा होईल. यानंतर 25 किंवा 26 फेब्रुवारीला महापालिकेचा अर्थसंकल्प सादर होईल असे सांगण्यात येते.
अजित पवार गटाची आज नोंदणी
अजित पवार गटाच्या नगरसेवकांकडे नोंदणीसाठी लागणाऱ्या कागदपत्रांमध्ये काही त्रुटी होत्या. त्यामुळे त्यांच्या तीन नगरसेवकांची नोंदणी आज झाली नाही. उद्या मंगळवारी त्यांची गटनोंदणी होणार आहे.
नगरसेवकांवर वॉच
भाजप व शिंदे गटाने बहुमताचा आकडा गाठला असला तरी आपल्या नगरसेवकांवर आजही त्यांचा विश्वास नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे प्रत्येक नगरसेवकाच्या हालचालीवर वरिष्ठ नेत्याकडून बारीक नजर ठेवली जात आहे. कोकण आयुक्तांकडे गट नोंदणीसाठी जाण्यापूर्वी भाजप व शिंदे गटाने आपल्या नगरसेवकांना महापालिका मुख्यालयात एकत्रित केले. कोणीही परस्पर कोकण भवन आयुक्तांकडे जाऊ नये, असे आदेशवजा तंबीच भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी दिली होती.






























































