अहिल्यानगरमध्ये उद्यापासून ‘कृषीपर्व’ महोत्सव, धान्य, खाद्यपदार्थ तज्ञांच्या मार्गदर्शनाची पर्वणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महाराष्ट्र शासन, कृषी विभाग, आत्मा (ATMA), जिल्हा परिषद अहिल्यानगर आणि एक्सपो इंडियन ओशियन प्रा. लि. यांच्या संयुक्त विद्यमाने अहिल्यानगरमध्ये 5 ते 9 फेब्रुवारी या कालावधीत ‘कृषिपर्व’ हा भव्य जिल्हा कृषी महोत्सव आणि कृषी परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. केडगाव रोडवरील नेमाने इस्टेट येथे हा महोत्सव रंगणार असून, यात आधुनिक शेती तंत्रज्ञान आणि ग्रामीण संस्कृतीचा संगम पाहायला मिळणार आहे.

जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा होणार आहे.

आधुनिकतेची कास धरत यावर्षी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय), रोबोटिक्स (आयओटी) आणि काटेकोर शेती या विषयांवर विशेष भर देण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आणि प्रकल्प संचालक ‘आत्मा’ यांनी दिली.

दरम्यान, महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी विधान परिषदेचे सभापती आमदार प्रा. राम शिंदे, जिल्ह्याचे पालकमंत्री आमदार डॉ. राधाकृष्ण विखे-पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

थेट शेतकऱ्यांकडून धान्यखरेदीची संधी

यात धान्य महोत्सवाचे खास आयोजन करण्यात आले असून, नागरिकांना वर्षभरासाठी लागणारे अन्नधान्य थेट शेतकऱयांकडून खरेदी करता येईल. यात जामखेडची प्रसिद्ध ज्वारी, अकोल्याचा सुवासिक इंद्रायणी व हातसडीचा तांदूळ, गावरान मटकी, गहू आणि विविध कडधान्ये उपलब्ध असतील.

खाद्य महोत्सव मुख्य आकर्षण

खवय्यांसाठी ‘खाद्य महोत्सव’ हे मुख्य आकर्षण असेल. यामध्ये शिपी आमटी, शिंगोरी आमटी, मांडे, थालपीठ यांसारख्या अस्सल गावरान पदार्थांचा आस्वाद घेता येईल. महिला बचत गटांनी तयार केलेली उत्पादने आणि प्रक्रिया केलेले पदार्थ विक्रीसाठी उपलब्ध असतील.

500 स्टॉल्स आणि तज्ञांचे मार्गदर्शन

महोत्सवात एकूण 500 स्टॉल्स असणार आहेत. यामध्ये कृषी यांत्रिकीकरणासाठी 121, महिला बचत गटांसाठी 100, धान्य विक्रीसाठी 48 आणि खाद्य महोत्सवासाठी 75 स्टॉल्सचा समावेश आहे. याशिवाय, पाच दिवसांच्या कालावधीत विविध तांत्रिक सत्रांचे आयोजन करण्यात आले असून, त्यात कृषी क्षेत्रातील तज्ञ आणि अधिकारी शेतकऱयांना मार्गदर्शन करणार आहेत.