
पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या मुंबई–पुणे एक्सप्रेसवेवर मंगळवारी संध्याकाळी एक केमिकल टँकर उलटला होता. त्यानंतर मुंबई–पुणे महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली असून वाहतूक ठप्प झाली आहे. गेल्या 20 तासांहून अधिक काळ ही स्थिती कायम आहे. त्यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारला धारेवर धरले आहे.
It’s beyond absurd that the Government can’t intervene and help people stuck on the Mumbai- Pune Expressway for over 20 hours.
For all the talk of development and good governance, a basic intervention could have helped by reaching out to the people and offering food/ water/…
— Aaditya Thackeray (@AUThackeray) February 4, 2026
”मुंबई पुणे एक्स्प्रेस वेवर अडकलेल्या लोकांचे हाल सुरू आहेत. सरकार मात्र ढिम्म आहे. गेल्या 20 तासात सरकार या लोकांना काहीच मदत करू शकत नाही हे समजण्यापलिकडे आहे. विकासाच्या आणि उत्तम कारभाराच्या बाता मारणारे महामार्गावर अडकलेल्या लोकांना अन्न पाणी, शौचालय अशा साध्या सोयी उपलब्ध करून देऊ शकत होते. लोकांच्या दयनीय अवस्थेबद्दल तसंच त्यांना जो त्रास सहन करावा लागत आहे त्याविषयी ऐकत आहे. महामार्गांच्या देखभालीसाठी जो टोल आकारला जातो त्या टोल आकारणाऱ्यांना यासाठी पैसे द्यायला लावायला नको का?”, असे आदित्य ठाकरे यांनी ट्विट केले आहे.
जुन्या मुंबई–पुणे महामार्गावर तसेच मुंबई–पुणे एक्सप्रेसवेवर खालापूर टोल नाक्यापासून लोणावळ्यापर्यंत पुण्याकडे जाणाऱ्या मार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक ठप्प झाली आहे. त्यामुळे दोन्ही मार्गांवरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. वाहतूक कोंडीबाबत कोणतीही पूर्वसूचना, संदेश किंवा पर्यायी मार्गांची माहिती न दिल्याने प्रवाशांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. तासन्तास वाहनांत अडकून पडलेल्या प्रवाशांना पाणी, अन्न किंवा इतर मूलभूत सुविधांचाही अभाव जाणवत आहे. अशा परिस्थितीतही खालापूर टोल नाक्यावर टोल वसुली सुरूच असल्याने प्रवाशांचा रोष अधिक वाढला आहे. “आम्ही तासन्तास अडकलो आहोत, पुढे रस्ता बंद आहे, तरीही टोल का आकारला जातो?” असा सवाल अनेक प्रवाशांनी टोल कर्मचाऱ्यांना केला. काही प्रवाशांनी थेट जाब विचारत संताप व्यक्त केला आहे. गेल्या 20 तासांपासून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना कोणतीही अधिकृत माहिती न मिळाल्याने प्रशासन आणि वाहतूक यंत्रणेच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. महिलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वच प्रवासी या वाहतूक कोंडीत अडकले असून, परिस्थिती लवकरात लवकर नियंत्रणात आणण्याची मागणी केली जात आहे.




























































