
वृद्ध महिलेला डिजिटल अटकेची भीती दाखवून 4 कोटी 62 लाख रुपयांची फसवणूक प्रकरणी दोघांना पश्चिम सायबर पोलिसांनी अटक केली. नरेंद्र सिन्हा आणि गुंजन देवकुमार दिनेशचंद्र अशी त्या दोघांची नावे आहेत.
तक्रारदार या पवई आयआयटीमधून निवृत्त झाल्या आहेत. गेल्या ऑक्टोबर महिन्यात त्यांना एकाने फोन केला. ठगाने तो दिल्ली पोलीस अधिकारी असल्याचे भासवले. त्याच्या विरोधात मनी लाँडरिंग आणि शारीरिक शोषणाचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. त्या गुह्यात चौकशी होणार असल्याचे सांगण्यात आले. तसेच पोलिसांना तपासात सहकार्य करण्यास सांगितले. ठगाने डिजिटल अटकेची भीती दाखवून महिलेच्या बँक खात्याचा तपशील मागितला. चौकशी झाल्यावर ती रक्कम पुन्हा देऊ असे भासवले गेले. अटकेच्या भीती या महिलेने तिच्या बँक खात्यातील रक्कम आणि आरडीमधील रक्कम काढली. ठगाने तिच्याकडून 4 कोटी 62 लाख रुपये उकळले. पैसे दिल्यानंतर कोणतीही चौकशी झाली नाही. हा प्रकार संशयास्पद वाटल्याने तिने पश्चिम सायबर पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी गुन्हा नोंद केला. तपासा दरम्यान पोलिसांना महत्त्वाची माहिती मिळाली. त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी नरेंद्र आणि गुंजनला ताब्यात घेतले.



























































