
सांगली-मिरज-कुपवाड महापालिकेत भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसची अखेर युती झाली. बुधवारी (दि. 4) महापौरपदासाठी भाजपकडून धीरज सूर्यवंशी, तर उपमहापौरपदी राष्ट्रवादी (अजित पवार) गटाकडून गजानन मगदूम यांचा अर्ज दाखल करण्यात आला. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने युतीला ‘बाय’ दिल्याने बिनविरोध निवडी पार पडल्या आहेत. या निवडीची अधिकृत घोषणा मंगळवारी (दि. 10) विशेष महासभेत होणार आहे.
महापालिकेच्या निवडणुकीत भाजपला काठावरचे बहुमत मिळाले; पण मजबूत बहुमतासाठी भाजपच्या नेत्यांनी महायुतीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर चर्चा केली. यामध्ये राष्ट्रवादीला पाच वर्षे उपमहापौरपद, तर दोन वर्षे स्थायी समिती सभापतिपदावर युतीचा निर्णय झाला. बुधवारी (दि. 4) पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी महापौरपदाबाबत आमदार सुरेश खाडे, आमदार सुधीर गाडगीळ, प्रदेश उपाध्यक्ष शेखर इनामदार, मकरंद देशपांडे आदींसह कोअर कमिटीबरोबर चर्चा करून धीरज सूर्यवंशी यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. सूर्यवंशी यांचा महापौरपदासाठी अर्ज दाखल केला. त्यांनी दोन अर्ज दाखल केले आहेत. उपमहापौरपद हे राष्ट्रवादी काँग्रेसला दिले आहे. उपमहापौरपदासाठी गजानन मगदूम, विष्णू माने, रेश्मा चौधरी यांच्यासह सहाजण इच्छुक होते. बुधवारी सकाळी राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा.पद्माकर जगदाळे, आमदार इद्रिस नायकवडी व गटनेते मैनुद्दीन बागवान यांच्यात चर्चा झाली. चर्चेनंतर गजानन मगदूम यांच्या नावावर एकमत झाले.
काँग्रेस पक्षाकडून महापौर व उपमहापौरपदासाठी मंगळवारी अर्ज घेतले गेले होते; पण बुधवारी काँग्रेसचे नगरसेवक महापालिकेकडे फिरकले नाहीत. त्यांनी भाजप व राष्ट्रवादी युतीला बाय दिली. त्यामुळे महापौरपदी धीरज सूर्यवंशी, तर उपमहापौरपदी मगदूम यांची बिनविरोध निवड झाली.
महापालिकेत भाजप-राष्ट्रवादीचे मजबूत संख्याबळ
महापालिकेच्या निवडणुकीत भाजपला अगदी काठावरचे बहुमत होते. त्यांनी राष्ट्रवादी (अजित पवार) गटाला सोबत घेताना महापौरपद भाजपाला, तर राष्ट्रवादी काँग्रेसला उपमहापौरपद दिले. त्यामुळे भाजपचे 39, तर राष्ट्रवादीचे 16 असे 55चे मजबूत संख्याबळ भाजप-राष्ट्रवादी युतीकडे झाले आहे.



























































