
>> मेधा पालकर
शिक्षणाला व्यावसायिक शिक्षणाची जोड मिळाली तर ते शिक्षण कसं प्रत्यक्ष जीवनात उपयोगी ठरते हे अवघ्या नववीच्या विद्यार्थ्यांनी दाखून दिलं आहे. भारत सरकारच्या प्रधान वैज्ञानिक सल्लागार कार्यालयांतर्गत कार्यरत असलेल्या पुणे नॉलेज क्लस्टरने, सलाम बॉम्बे फाऊंडेशनने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात EduConclave 3.0 चे आयोजन केले होते. विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष जीवनातील समस्यांवर उपाय सुचवणारे प्रकल्प तयार केले. मुंबई, पुणे आणि नाशिक येथील 25 हून अधिक शाळांमधील 750 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी रोबोटिक्स, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि इतर नव्या तंत्रज्ञान क्षेत्रांतील 100 हून अधिक प्रकल्प विकसित केले. यापैकी सर्वोत्तम 14 प्रकल्प परिषदेत सादर करण्यात आले.
या नवकल्पनांपैकी SpoilAlert हा प्रकल्प विशेष लक्षवेधी आहे. आयुष भोसले आणि श्रेयश बिले या विद्यार्थ्यांनी विकसित केलेला हा हातात धरण्यायोग्य फूड सेफ्टी स्कॅनर अन्न ताजे आहे की खराब झाले आहे हे ओळखतो. असाच शेतसुरक्षा हा प्रकल्पही विशेष ठरला. अर्जुन विश्वासराव आणि सोहम हजारे यांनी विकसित केलेला हा स्वयंचलित शेती रोबोट झाडे व मातीची स्थिती तपासतो, केवळ कोरड्या भागांनाच पाणी देतो, पावसाची नोंद घेतो, किडींपासून संरक्षण करतो आणि शेतकऱयाच्या मोबाईलवर रिअल-टाइम माहिती पाठवतो. इतर नवकल्पनांमध्ये रुग्णालयातील सलाईन पातळी मोजून सूचना देणारी प्रणाली, बारकोड स्कॅन करणारी, वजन पडताळणी करणारी आणि मोबाईलवर थेट बिल दाखवणारी स्मार्ट शॉपिंग ट्रॉली, सुरक्षित, डुप्लिकेट-फ्री डिजिटल मतदान प्रणाली, अपघात स्थळाचे लोकेशन आपत्कालीन संपर्कांना पाठवणारी सायकल-आधारित प्रणाली यांचा समावेश आहे.
शालेय जीवनापासूनच विद्यार्थ्यांना व्यावसायिक शिक्षण दिलं तर त्याचा त्यांना भावी आयुष्यात उपयोग आणि महत्त्व कळेल. या उद्देशाने सलाम बॉम्बे फाऊंडेशनने व्यावसायिक शिक्षण द्यायला सुरुवात केली. विद्यार्थ्यांमधील कौशल्य विकसित करून त्यांना व्यावसायिक शिक्षण दिले आहे, असे सलाम बॉम्बे फाऊंडेशनच्या संचालक (स्किल्स-स्कूल) जयशीला तांबे यांनी ही माहिती दिली.



























































