US India Trade deal – पीयूष गोयल यांनी परराष्ट्र मंत्र्यांकडे टोलवला चेंडू; परराष्ट्रमंत्री म्हणतात, मला माहितीच नाही!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थान आणि अमेरिका यांच्यातील व्यापार करारावर विरोधकांनी तीव्र हल्ला चढवला आहे. या कराराबाबत माहिती देण्याची मागणी जोर धरू लागल्यावर केंद्रीय वाणिज्यमंत्र्यांनी काही प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. मात्र, रशियाकडून तेल खरेदी बंद करणार का? असा सवाल विचारल्यावर त्यांनी चेंडू परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याकडे टोलवला आहे. त्यावर एस. जयशंकर यांनी याबाबत आपल्याला काहीही माहिती नाही, असे सांगितले. त्यामुळे या दोन्ही खात्यातील समन्वयाचा अभाव आणि करारातील गोंधळ उघड झाला आहे.

हिंदुस्थान रशियाकडून तेल खरेदी करणे थांबवेल की सुरू ठेवेल या प्रश्नाचे केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांनी थेट उत्तर दिले नाही. त्यांनी सांगितले की केवळ परराष्ट्र मंत्रालयच या विषयावर माहिती देऊ शकेल. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एका पोस्टमध्ये दावा केला होता की, जर अमेरिकेशी करार झाला तर हिंदुस्थान रशियाकडून तेल खरेदी करणे थांबवेल. मात्र, याबाबत केंद्र सरकारकडून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आली नसल्याने याबाबत संभ्रम आहे.

पियुष गोयल यांनी सांगितले की, हिंदुस्थानला अमेरिकेच्या कमी दरांचा सामना करावा लागत आहे, जो इतर अर्थव्यवस्थांपेक्षा खूपच कमी आहे. दोन्ही देशांमधील व्यापार करारामुळे भारतीय शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही. अमेरिका शेजारील व्हिएतनाम आणि बांगलादेशवर २० टक्के, इंडोनेशियावर १९ टक्के आणि चीनवर ३५ टक्के दर आकारतो. त्यांनी असेही सांगितले की असे अनेक वस्तू आहेत ज्या आमचे निर्यातदार कोणत्याही दराशिवाय अमेरिकेला पाठवू शकतात. रशियाकडून तेल खरेदीबाबत विचारता, त्यांनी याबाबत परराष्ट्रमंत्रीच सांगू शकतात, असे उत्तर देत टोलवाटोलवी केली.

परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी सांगितले की, प्रस्तावित करारावर सविस्तर चर्चा सुरू आहे आणि ती वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाद्वारे हाताळली जात आहे. जयशंकर म्हणाले, मी चर्चेत सहभागी नव्हतो, वाणिज्य आणि उद्योग मंत्री हे हाताळत आहेत. पंतप्रधान आणि अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांमध्ये चर्चा झाली, काही घोषणा झाल्या. त्यानंतर, आता व्यापार चर्चेचे तपशील तयार केले जात आहेत. कराराबाबत आणि तेलखरेदीबाबत मला काहीच माहिती नाही. केंद्रीय मंत्री पियुष गोयल, जे अमेरिकेचे व्यापार प्रतिनिधी जेमीसन ग्रीर यांच्याशी थेट संबंधित आहेत, ते याचे उत्तर देऊ शकतील, असे सांगत त्यांनीही टोलवाटोलवी केली.