
>>गणेश पुराणिक<<
आयसीसी टी-20 वर्ल्डकप 2026 मधील पाचवा सामना इंग्लंड आणि नेपाळ संघात मुंबईतील ऐतिहासिक वानखेडे मैदानावर रंगला. नेहमी निळ्या रंगात न्हाऊन निघणाऱ्या या मैदानावर रविवारी एक आगळावेगळा नजारा पाहायला मिळाला. इंग्लंड विरुद्ध सामन्यादरम्यान संपूर्ण मैदान नेपाळी चाहत्यांनी भरून गेले होते. अरबी समुद्राच्या किनाऱ्यावरील निळ्याशार मुंबईत आज लाल- निळ्या रंगाचे जणू ‘वादळ’ आले होते, ज्यामुळे वानखेडेवर मुंबईत आहोत की काठमांडूमध्ये, असा प्रश्न उपस्थित व्हावा इतकी गर्दी नेपाळी समर्थकांनी केली होती.
मैदानावर ‘होम ग्राऊंड’सारखे वातावरण

नाणेफेक होण्यापूर्वीच नेपाळी चाहत्यांनी ढोल-ताशांच्या गजरात आणि आपल्या राष्ट्रीय ध्वजासह वानखेडेचा परिसर दणाणून सोडला. प्रत्येक निर्धाव चेंडूवर होणारा जल्लोष आणि इंग्लंडच्या प्रत्येक विकेटवर मिळणारी दाद यामुळे नेपाळच्या संघाला परदेशातही मायदेशात खेळत असल्याचा अनुभव मिळाला. जय नेपाळ या घोषणाबाजीने संपूर्ण वानखेडे नेपाळमय झाले. या लढतीसाठी किंबहुना वर्ल्डकपसाठी नेपाळमधूनच नव्हे, तर हिंदुस्थानातील विविध शहरांतून हजारो नेपाळी नागरिक आपल्या संघाला पाठिंबा देण्यासाठी मुंबईत दाखल झाले.
नेपाळ क्रिकेटची वाढती ताकद

गेल्या काही वर्षांत नेपाळ क्रिकेटने जागतिक स्तरावर आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. 2024 च्या विश्वचषकात अमेरिकेतील डॅलासमध्येही अशाच प्रकारे नेपाळी चाहत्यांनी गर्दी केली होती. तसेच, नेपाळमधील ‘नेपाळ प्रीमियर लीग’ला (NPL) मिळणारा प्रचंड प्रतिसाद क्रिकेटमधील त्यांच्या वाढत्या आवडीचा पुरावा आहे.
नेपाळचा विश्वचषकातील प्रवास
* 2014: पहिल्यांदा टी-20 विश्वचषकासाठी पात्र.
* 2024: 10 वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर पुनरागमन.
* 2025: शारजाहमध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध ऐतिहासिक 2-1 ने मालिका विजय.
* 2026: आशिया आणि EAP पात्रता फेरीत अजिंक्य राहत तिसऱ्यांदा विश्वचषकात धडक.
यंदाच्या विश्वचषकात नेपाळचा समावेश ‘गट क’ (Group C) मध्ये असून, त्यांच्यासमोर इंग्लंड, वेस्ट इंडिज, स्कॉटलंड आणि इटली यांसारख्या संघांचे आव्हान आहे. आजच्या चाहत्यांच्या पाठिंब्यामुळे नेपाळचा संघ आगामी सामन्यांमध्ये मोठी उलटफेर करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

























































