
मध्य रेल्वे मार्गावरील लोकल ट्रेनमध्ये महिलांच्या डब्यात बुरखाधारी तरुणाने घुसखोरी केली. तरुणाच्या संशयास्पद हालचाली महिला प्रवाशांच्या निदर्शनास आल्या, तेव्हा पोलिसांच्या हाती लागण्याआधीच बुरखाधारी तरुणाने ट्रेनमधून उडी मारली आणि पळ काढला. घाटकोपर रेल्वे स्थानकात घडलेल्या या प्रकाराने महिला प्रवाशांमध्ये खळबळ उडाली आहे.
View this post on Instagram
मध्य रेल्वेच्या लोकलमध्ये शुक्रवारी हा खळबळजनक प्रकार घडल्याचे उघडकीस आले आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या (सीएसएमटी) दिशेने जाणारी लोकल ट्रेन घाटकोपर स्थानकात पोहोचत होती. त्याचदरम्यान बुरखाधारी तरुणाची महिलांच्या डब्यातील घुसखोरी उघड झाली. महिला प्रवाशांनी बुरखा परिधान केलेल्या तरुणाच्या हालचालींवर पाळत ठेवली होती. त्याच्या हालचाली संशयास्पद वाटल्यानंतर महिलांनी मोबाईलमध्ये त्याचे पह्टो काढण्याची हिंमत दाखवली. त्याला प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. महिलांना आपल्याबाबत संशय आल्याचे लक्षात येताच त्या बुरखाधारी तरुणाने लोकल प्लॅटफॉर्मवर उभी राहण्याआधीच ट्रेनमधून उडी मारली आणि कर्जतला जाणाऱ्या जलद लोकलमध्ये चढला. पुढे गर्दीत मिसळल्याने तो बुरखाधारी तरुण कोणाच्याही हाती लागला नाही. रेल्वे पोलिसांत घटनेची नोंद करण्यात आली. पोलिसांनी बुरखाधारी तरुणाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र घाटकोपर व इतर रेल्वे स्थानके वा अन्य भागांत कुठेही बुरखाधारीचा थांगपत्ता लागला नाही. त्या प्रकाराने महिला प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.




























































