देश विदेश – जेईई मेनच्या प्रश्नपत्रिकेत 17 चुका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जॉइंट इन्ट्रान्स एक्झाम (जेईई) मेन 2026, सेशन 1 च्या प्रश्नपत्रिकेत एक-दोन नव्हे, तर तब्बल 17 चुका आढळल्या आहेत. नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून (एनटीए)  ही परीक्षा 21 ते 29 जानेवारीला घेण्यात आली होती. या परीक्षेचा निकाल 12 फेब्रुवारीला जाहीर केला जाण्याची शक्यता आहे. त्याआधीच कोचिंग फेडरेशन ऑफ इंडियाने (सीएफआय)  10 गुण अतिरिक्त देण्याची मागणी केली आहे.

पंजाब नॅशनल बँकेत 5,138 पदांची भरती

पंजाब नॅशनल बँकमध्ये 5,138 पदांच्या अप्रेंटिस पदांसाठी भरती सुरू करण्यात आली आहे. या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज सुरू करण्यात आले असून अर्ज करण्याची अखेरची तारीख 28 फेब्रुवारी 2026 पर्यंत आहे. उमेदवार कोणत्याही विद्यापीठातून पदवी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे. निवड झालेल्या उमेदवाराला 12,300 ते 15 हजार रुपये प्रति महिना स्टायपेंड दिला जाईल. सविस्तर माहिती pnbindia.in वर दिली आहे.

ब्रिटनमध्ये डॉक्टरला 24 वर्षे तुरुंगवास

ब्रिटनमध्ये लहान मुलांचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी एका 76 वर्षीय पशुवैद्यकीय डॉक्टरला 23 वर्षे 10 महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली आहे. जॉन रुबेन असे या डॉक्टरचे नाव आहे. आरोपी डॉक्टरने समर कॅम्पमध्ये मुलांना दिल्या जाणाऱ्या कँडीमध्ये अमली पदार्थ मिसळून त्यांचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे. जॉन रुबेनने नोव्हेंबरमध्ये न्यायालयात 17 प्रकरणांमध्ये आपला गुन्हा कबूल केला होता.

मेटाच्या धोरणावर 23 फेब्रुवारीला सुनावणी

मेटा-व्हॉट्सऍपच्या खासगी धोरणावर आणि 213 कोटी रुपयांच्या दंडावरील प्रकरणावर आता 23 फेब्रुवारीला सुनावणी होणार आहे. मेटा आणि व्हॉट्सऍपची बाजू सुप्रीम कोर्टात मांडणारे ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांची प्रकृती ठीक नसल्याने सोमवारी त्यावर सुनावणी झाली नाही. या खंडपीठात सरन्यायाधीश सूर्य कांत, न्यायाधीश जॉयमाल्या बागची आणि न्यायाधीश एन. व्ही. अंजारिया यांचाही समावेश आहे.