
>> मंगेश दराडे
म्हाडाच्या घरांसाठी अर्ज करताना अर्जदाराला महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र (डोमेसाईल सर्टिफिकेट) बंधनकारक असते. मात्र प्रथम येणाऱयास प्रथम प्राधान्य योजनेतील 120 घरांच्या विक्रीसाठी अर्जदारांना डोमेसाईलची अटच घातली नसल्याची चूक ऐन वेळी लक्षात येताच या घरांची जाहिरात पुढे ढकलण्याची नामुष्की म्हाडावर ओढवली. म्हाडाच्या या घोडचुकीमुळे घराच्या प्रतीक्षेत असलेल्या अर्जदारांचा मात्र हिरमोड झाला आहे.
सोडतीत दोन वेळा समावेश करूनही विक्री न झालेल्या मालवणी, चारकोप, अॅण्टॉप हिल, ताडदेव, भायखळा, लोअर परळ येथील 120 घरांची विक्री ‘प्रथम येणाऱयास प्रथम प्राधान्य’ या योजनेअंतर्गत केली जाणार आहे. पहिल्यांदाच मुंबईत लॉटरीशिवाय घराचे स्वप्न साकार होणार असल्याने लाखो अर्जदार या योजनेकडे आशेने डोळे लावून बसले आहेत. या घरांसाठी म्हाडाच्या संकेतस्थळावर 5 फेब्रुवारीपासून ऑनलाईन अर्ज नोंदणी सुरू होणार होती. याच दिवशी योजनेतील घरांची सविस्तर जाहिरात आणि माहिती पुस्तिका उपलब्ध होणार होती.
‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ या योजनेतील घरासाठी अर्जदारांना म्हाडाने वेगवेगळ्या नियम आणि अटी घातल्या. परंतु अटी व शर्तीमध्ये अर्जदारांना वास्तव्याचा पुरावा असलेली डोमेसाईलची अटच घातलेली नाही हे ऐन वेळी म्हाडाच्या लक्षात आले. ही अट घातली नसती तर देशाच्या कानाकोपऱयातील कोणतीही व्यक्ती या घरासाठी अर्ज करू शकली असती. त्यामुळे ही चूक दुरुस्त करण्यासाठी म्हाडाने तांत्रिक कारण देत ही योजना पुढे ढकलली.
सॉफ्टवेअरमध्ये आवश्यक बदल करण्याचे काम सुरू
याबाबत म्हाडाच्या एका वरिष्ठ अधिकाऱयाशी संपर्प साधला असता त्यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. तसेच अर्जदारांना डोमेसाईलची अट घालण्यात येणार असून त्यादृष्टीने सॉफ्टवेअरमध्ये आवश्यक ते बदल करण्याचे काम सुरू आहे. हे काम पूर्ण होताच या योजनेची जाहिरात प्रसिद्ध होईल, असे त्यांनी सांगितले.


























































