
व्हॉट्सअपद्वारे परपुरुषांना संपर्क साधायचा. मग लाडीक बोलून त्यांच्याशी जवळीक साधायची. त्यांना आकर्षित करून भेटायला बोलवायचे आणि तेथेच साथीदारांकरवी संबंधिताला लुटायचे. अशा प्रकारे हनी ट्रप लावून लुटमार करणाऱ्या चौघांच्या देवनार पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत.
श्रद्धा नावाच्या महिलेने एका व्यक्तीला व्हॉट्सअपद्वारे संपर्क साधला. मग त्याच्याशी लाडीक बोलणे करून जवळीक साधली. त्यानंतर तोकडय़ा कपडय़ावरील फोटो पाठवून त्या व्यक्तीला आपल्या नादी लावले. दरम्यान, रोज डेनिमित्त श्रद्धाने त्याला शिवाजीनगर सिग्नल येथील झायका हॉटेलमध्ये बोलावले. त्यानुसार ती व्यक्ती तेथे पोहचली. हॉटेलमध्ये जेवणाचे पार्सल घेऊन ते बाहेर पडत असताना आधीच तेथे थांबलेल्या अनिता, शिवम आणि मल्लेश यांनी त्याला बाजूला नेले. महिलांना छेडतोस का, त्यांना लॉजवर येण्यास बोलतो का, असा जाब विचारत त्याला मारहाण करण्यास सुरुवात केली.
तसेच त्याच्या खिशातील दहा हजार रुपये घेऊन चौघेही तेथून पसार झाले. या प्रकरणी त्या व्यक्तीने देवनार पोलिसात तक्रार दिल्यानंतर वरिष्ठ निरीक्षक रमेश यादव, पोलीस निरीक्षक विजय अंबरगे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि राहुल मोकाटे, उपनिरीक्षक अनिल महानूर व पथकाने तपास करून खार पूर्वेकडे राहणाऱया श्रद्धा जोशी, अनिता कुशवाह, शिवम माने आणि मल्लेश कुर्शी अशा चौघांना अटक केली. देवनार पोलीस अधिक तपास करीत आहेत.



























































