जैतापूर सामूहिक कॉपी प्रकरणी, तीन जण निलंबित; 24 जणांविरोधात गुन्हा दाखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कन्नड तालुक्यातील जैतापूर येथील सामूहिक कॉपी प्रकरणामुळे शिक्षण मंडळाच्या इभ्रतीचा पार कचरा झाला. सीसीटीव्हीने पकडून दिलेल्या या कॉपी प्रकरणात 24 अधिकारी, कर्मचाऱयांच्या विरोधात कारवाई प्रस्तावित करण्यात आली असून केंद्रप्रमुखांसह तीन जणांचे तडकाफडकी निलंबन करण्यात आले आहे. या सर्वांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बारावीच्या पहिल्याच पेपरला कन्नडच्या जैतापूर येथील राष्ट्रीय विद्यालयातील सामूहिक कॉपीने शिक्षण मंडळाचे नाकच कापले. या केंद्रावरील बैठे पथक चक्क झोपले होते. पहाऱयावरील पोलीस पेंगले होते, पण सीसीटीव्हीने मात्र सुरू असलेली सामूहिक कॉपी बरोबर पकडली. शिक्षणाधिकारी अश्विनी लाठकर यांच्या भरारी पथकाने दुपारी अचानक दिलेल्या भेटीत हा सारा प्रकार समोर आला.