
चेक बाउन्स प्रकरणात बॉलिवूड अभिनेता राजपाल यादवला जामीन मंजूर झालेला नाही. दिल्ली उच्च न्यायालय आता १६ फेब्रुवारीला या प्रकरणाची सुनावणी करणार आहे. त्यांच्यावर ₹९ कोटींचे कर्ज असून, या खटल्याची सुनावणी आज झाली. दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर तिहार तुरुंगात आत्मसमर्पण केले होते. यादव यांच्या वकिलाने न्यायालयाला माहिती दिली की, त्यांनी त्यांच्या अशिलाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होता परंतु त्यांच्याशी बोलू शकले नाहीत. त्यांनी सोमवारपर्यंत खटला पुढे ढकलण्याची विनंतीही केली. अभिनेत्याच्या वकिलाने असेही सांगितले की, तोपर्यंत पुढील युक्तिवादांसह न्यायालयात हजर राहतील.
राजपाल यादव यांच्या वकिलाने त्यांच्या मोठ्या भावाच्या मुलीच्या लग्नाला उपस्थित राहण्यासाठी अंतरिम जामीन मागितला होता. त्यांच्या वकिलांनी न्यायालयाला आश्वासन दिले की, ते उर्वरित रक्कम ताबडतोब न्यायालयात जमा करण्यास तयार आहेत.
राजपाल यादवने २०१० मध्ये मेसर्स मुरली प्रोजेक्ट्स प्रायव्हेट लिमिटेडकडून त्यांचा दिग्दर्शित चित्रपट “आता पता लपता” बनवण्यासाठी सुमारे ५ कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. चित्रपट यशस्वी झाला नाही, त्याचे पेमेंट उशिरा झाले आणि अनेक चेक बाउन्स झाले. त्यानंतर, त्याच्याविरुद्ध निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स कायद्याच्या कलम १३८ अंतर्गत खटला दाखल करण्यात आला होता. दिल्ली उच्च न्यायालयाने त्यांना अनेक संधी दिल्या, परंतु वारंवार अपयश आल्यामुळे, न्यायालयाने अखेर नोटीस बजावली. नोटीशीनुसार ४ फेब्रुवारीला आत्मसमर्पण करण्याचे आदेश दिले. आता या प्रकरणाची पुढील सुनावणी १६ फेब्रुवारीला होणार आहे.



























































