जाऊ शब्दांच्या गावा – सुंठीवाचून खोकला गेला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> साधना गोरे 

भारतीय माणसाचं एक आवडतं पेय म्हणजे चहा. काही जण ते दिवसांतून एक वेळा पितात, तर काही चार-पाच कपही सहज पचवतात. काहींना सकाळी उठल्या उठल्या चहा हवा असतो, तर काहींना रात्रीच्या जेवणानंतरही. शिवाय चहा करण्याच्या तऱहाही किती निरनिराळ्या! कुणाला नुसता दुधाचा, पुणाला अगदी कोरा, कुणाला विशिष्ट मसाल्याचा चहा आवडतो. त्यात पुन्हा गवती चहा, लिंबाचा चहा हेही प्रकार आहेत. पण सगळ्यात लोकप्रिय चहा कुठला तर आल्याचा. आलं किसून टाकलं की ठेचून यावरूनही चहाची चव बदलते. चहाप्रेमी यातले बारकावे आणखी तपशिलात सांगू शकतील. तर आपला आजचा शब्द आहे ‘अले’ किंवा ‘आले’.

आलं म्हणजे ओली सुंठ. आलं पाचक व घशासाठी हितकारक आहे. त्यामुळे घशाला सूज आल्यास, कफ, वायू कंठरोग, खोकला, मलबद्धता, वांती, शूळ यांसारख्या विकारांवर आलं अत्यंत उपयुक्त ठरतं. ते भारतातल्या सर्व प्रदेशात पिकतं. श्वासाच्या, घशाच्या विकारांवर  आल्याच्या रसात गूळ किंवा साखर घालून तयार केलेला आलेपाक उपयुक्त असतो. तर या ‘आले’ शब्दाविषयी सांगताना कृ. पां. कुलकर्णी म्हणतात, संस्पृतमध्ये ‘आर्द्र’, ‘आर्द्रक’ शब्द आहेत. प्राकृतमध्ये ‘अल्ल’, कानडीत ‘अल्ल’, गुजरातीमध्ये ‘आदु’, सिंधीत ‘अदिरक’, हिंदीत ‘अदरक’, कश्मिरीमध्ये ‘ओदरू’ अशी रूपं आहेत. कुलकर्णी असंही म्हणतात, ‘मराठीतील आले शब्दाच्या मुळाशी संस्पृतमधील आलु, आलुकम् हे शब्द असावेत. आद्र, आद्रक ही रूपं उत्तरकालीन संस्कृतीकरण केल्यासारखी दिसतात. कानडीतला शब्दही संस्कृत आलु, आलुकम् या शब्दांपासून आला असावा.’

आलं वाळल्यावर त्याची सुंठ होते. चांगल्या प्रतीची औषधी सुंठ तयार करण्यासाठी चुना आणि गंधक यांचाही प्रमाणात वापर केला जातो. या सुंठ शब्दाची गोष्ट मोठी रंजक आहे. सुंठीला संस्पृतमध्ये ‘शुण्डि’, प्राकृतमध्ये ‘सुण्ठी’, बंगाली व गुजरातीत ‘सुंठ’, उडियामध्ये ‘सुंठि’, हिंदीत ‘सुंठ’ किंवा ‘सोंठ’, पंजाबीत ‘सुण्ड’, सिंधीत ‘सुंढि’, गुजरातीत सुंठ, कानडीत सुन्डे अशी रूपं आहेत. मल्याळममध्ये सुंठीला इंचि आणि ओल्या आल्याला इंचिवेर म्हटलं जातं. या इंचीची सिंची, चिंची अशी रूपं होऊन कानडीत सुंडी झाले. या कानडीपासूनच मराठीत सुंठ शब्द आला, संस्पृतमधील ‘शृंगवेर’ हे नंतरचे संस्कृतीकरण आहे, असं कुलकर्णी म्हणतात.

इंग्रजीत आल्याला ‘जिंजर’ म्हणतात. या ‘जिंजर’ शब्दाचा आणि संस्पृत ‘शृंगवेर’ व प्राकृत ‘सिंगवेरी’ शब्दांशी संबंध आहे. या ‘जिंजर’ शब्दाचा इतिहास मोठा रंजक आहे आणि जगभरातल्या पुष्कळ भाषांमध्ये त्याचा प्रवास झालेला आहे. इंग्रजीतील ‘जिंजर’ शब्द लॅटिनमधील ‘जिंजीबेरी’पासून आला; आणि लॅटिनमध्ये तो ग्रीकमधील ‘जिंजीबेरिस’पासून आला. ग्रीकमधील ‘जिंजीबेरिस’ शब्दाची निर्मिती प्राकृतमधील ‘सिंगीवेरी’ शब्दापासून झाल्याचे मानले जाते; आणि प्राकृतमध्ये तो शब्द संस्पृमधील ‘शृंगवेरम्’पासून आला, असं एक मत आहे. या व्युत्पत्तीपेक्षा काही भाषावैज्ञानिक आणखी एक वेगळी व्युत्पत्ती मांडतात. त्यांच्या मते, ‘जिंजर’ शब्द संस्पृतमधील शृंगवेरम् शब्दापासून आलेला नसून तो द्रविडी भाषांमधून आलेला आहे. प्राचीन द्रविड भाषांमध्ये ‘इंची’ शब्द आहे. त्याचा अर्थ मूळ, कंद असा आहे. या शब्दापासून तामीळमध्ये ‘इंजीवेरी’ शब्द आला. तामीळच्या माध्यमातूनच हा शब्द पूर्व व पश्चिम आशियामध्ये आणि नंतर युरोपमध्ये पोहोचला. उदा. लॅटिनमध्ये ‘जिंजवेर’, जर्मनीत ‘इंगवर’, सिंहलीमध्ये ‘इंगरू’, रशियनमध्ये ‘इंबिर’ अशी रूपं आहेत.

याविषयी कृ. पां. कुलकर्णी म्हणतात, ‘संस्पृत व पाली भाषांमध्ये त्या शब्दाचा दुसरा अवयव ‘वेर’ असा आहे. पहिला अवयव ‘शृंग’ असा आहे. म्हणजे हा पदार्थ शिंगासारखा दिसतो. यातील वेर हा दुसरा अवयव द्राविडी असावा. वेर म्हणजे मूळ, कंद; शृंगासारखा कंद. समासाचा पहिला अवयव सिंगी हाही द्राविडी शब्द आहे. द्राविडी भाषांमध्ये हा शब्द आग्नेय दिशेकडील इंडोचायना वगैरे देशांकडून भारत व चीन देशांमध्ये आला. तिथल्या भाषांमध्येही ह्या स्वरूपाशी संलग्न रूपं आहेत.’

सुंठीवरून ‘सुंठीवाचून खोकला गेला’ ही एकमेव म्हण मराठीत आहे. ती आताही मोठय़ा प्रमाणात वापरली जाते, त्यामुळे तिचा अर्थ उलगडून सांगण्याची तशी गरज नाही. नव्या पिढीसाठी सांगायचं तर, खोकला आल्यावर घरगुती औषध म्हणून सुंठ खायला देतात. पण ती न खाताच खोकला जाणं म्हणजे परस्पर पीडा किंवा संकट टळलं असं समजलं जातं.

या आल्याचं हे मूळ ऐकून तुमचं डोकं भणभणलं असेल तर त्याला ठेचून चहात टाका आणि मग त्या चहातल्या आल्याची चव पाहा!