
दुखापतींच्या समस्यांनी त्रस्त ऑस्ट्रेलिया शुक्रवारी ब गटातील सामन्यात झिम्बाब्वेविरुद्ध मोठा विजय मिळवण्याच्या इराद्याने मैदानात उतरणार आहे. कर्णधार मिशेल मार्शच्या फिटनेसवर सर्वांचे लक्ष लागले आहे. तो आयर्लंडविरुद्ध खेळला नव्हता आणि पूर्णपणे तंदुरुस्त नसल्यास त्याच्या जागी खेळण्यासाठी स्टीव स्मिथ सज्ज आहे.
आयर्लंडविरुद्ध ऑस्ट्रेलियाने सर्व विभागांत वर्चस्व गाजवत 67 धावांनी दणदणीत विजय मिळवला. एकाही फलंदाजाने अर्धशतक झळकवले नाही, तरी 180 पेक्षा अधिक धावा उभ्या केल्या. त्यानंतर नॅथन एलिस आणि अॅडम झम्पाने मिळून आठ विकेट घेत सामना एकतर्फी केला. तरीही कांगारू झिम्बाब्वेविरुद्ध अधिक धारदार कामगिरीच्या शोधात असतील. ट्रविस हेड आणि ग्लेन मॅक्सवेलकडून मोठय़ा खेळीची अपेक्षा आहे. मार्श पुढे खेळू शकला नाही तरी स्मिथचा अनुभव संघासाठी बळ देणारा ठरेल.
झिम्बाब्वेनेही ओमानला सहज हरवत इशारा दिला आहे. ब्रॅड इव्हान्स, ब्लेसिंग मुजरबानी आणि रिचर्ड नगरवा यांचे वेगवान आक्रमण धोकादायक ठरू शकते, तर कर्णधार सिपंदर रझा गोलंदाजी आणि फलंदाजीत निर्णायक ठरू शकतो. त्यामुळे ऑस्ट्रेलिया झिम्बाब्वेला हलक्यात घेणार नाही.
ऑस्ट्रेलियाः मिशेल मार्श (कर्णधार), जेवियर बार्टलेट, पूपर कोनोली, टिम डेविड, बेन ड्वारशुईस, पॅमरन ग्रीन, नॅथन एलिस, ट्रविस हेड, जोश इंग्लिस, मॅथ्यू पुहनेमन, ग्लेन मॅक्सवेल, मॅथ्यू रेनशॉ, मार्पस स्टॉयनिस, अॅडम झम्पा, स्टीव स्मिथ.
झिम्बाब्वेः सिकंदर रझा (कर्णधार), ब्रायन बेनेट, रायन बर्ल, ग्रीम व्रेमर, ब्रॅडली इव्हान्स, क्लाईव्ह मदांडे, टिनोटेंडा मापोसा, तदिवानाशे मरुमणी, वेलिंग्टन मसाकाद्झा, टोनी मुनयोंगा, ताशिंगा मुसेकिवा, ब्लेसिंग मुजरबानी, डायोन मायर्स, रिचर्ड नगरवा, ब्रेंडन टेलर.

























































