भाषा सरस्वती – भाषिक अस्तित्वाची झुंज

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> धीरज कुलकर्णी

एकांड्या शिलेदाराप्रमाणे भाषिक अस्तित्वासाठी झुंज देत खडीया बोलीसाठी उभे राहणाऱया लेखिका रोज केरकेट्टा. लुप्त होऊ पाहणाऱया या बोलीत स्वतचे साहित्य व स्थान निर्माण करणाऱया रोज झारखंडमधील आदिवासी संस्कृतीचा स्वतंत्र आवाज ठरल्या आहेत.

भारतातील विपुल आणि समृद्ध भाषिक परंपरा या जगासाठी नेहमीच आश्चर्याची बाब ठरल्या आहेत. आदिवासी भागातील बोलीभाषांच्या अभ्यासासाठी सरकार व अभ्यासकांनी भरपूर मेहनत घेतली असल्याने आजही या भाषा आपले अस्तित्व टिकवून आहेत. परंतु या गोष्टी इतक्या सहज नव्हत्या. स्वातंत्र्यानंतरही भाषांच्या संवर्धनासाठी बराच काळ जावा लागला. अशा परिस्थितीत, एकांड्या शिलेदाराप्रमाणे भाषिक अस्तित्वासाठी झुंज देत त्या त्या भाषेत, बोलीत स्वतचे साहित्य व स्थान निर्माण करणारी अनेक नावे आहेत.

श्रीमती रोज केरकेट्टा हे अशा नावांपैकी एक. 1940 साली आजच्या झारखंडमध्ये त्यांचा एका खडीया आदिवासी कुटुंबात जन्म झाला. वडील प्यारा केरकेट्टा हे लोकप्रिय शिक्षक आणि समाजातील आंदोलनामध्ये सक्रिय सहभागी असल्याने घरातूनच रोज यांना बाळकडू मिळाले. प्राथमिक शिक्षण गावातूनच पूर्ण करून रांची विश्वविद्यालय येथून त्यांनी एमए डिग्री घेतली. पुढील आयुष्यात त्यांनी शिक्षकी पेशा पत्करून आदिवासी समाजातील मुलांना अधिकाधिक शिक्षण मिळेल यासाठी प्रयत्न केले. झारखंड, बुंदेलखंडच्या तत्कालीन समाजात शिक्षणाचे प्रमाण फारच कमी होते. स्त्रियांची परिस्थिती बघायलाच नको. त्यामुळे रोज यांनी प्रामुख्याने स्त्राrशिक्षण महत्त्वाचे मानले. स्त्रियांना केवळ शिक्षण देऊन पुरेसे नाही तर त्यांच्यासाठी आधुनिक रोजगार कोणते, त्याचाही त्यांनी अभ्यास केला व प्रयत्न केले.

सामाजिक क्षेत्रातील अनेक संघटनांशी त्या संबंधित होत्या. या माध्यमातून त्यांनी जंगल, आदिवासी समाज यांच्या समस्यांना वाचा फोडली. त्यांच्या सामाजिक कार्याबद्दल लिहायचे तर एक पुस्तक अपुरे होईल. साहित्यातही त्यांनी भरीव कामगिरी केली.

खडीया बोलीमध्ये त्यांनी अनेक रचना केल्या. यात कविता, कथा, कादंबरी यांचा समावेश आहे. पण केवळ कथा, कादंबरी यावर न थांबता, हिंदी भाषेत त्यांनी खडीया बोली, तिचे महत्त्व, व्याकरण आणि त्यातील प्राचीन साहित्य याबद्दल सातत्याने लेखन करून जगासमोर खडीया बोलीतील वाङ्मय आणले. खडीया बोलीसाठी वेगळा अभ्यासक्रम त्यांनी तयार केला. मैसूर येथील भारतीय भाषा संस्थान येथे त्यांनी खडीया बोलीतील ध्वनिविज्ञान यावर संशोधन केले.

बोलीभाषेतील सर्वात समृद्ध व पुरातन साहित्य म्हणजे लोककथा. त्या त्या समाजाची एक स्वतंत्र अस्मिता असणाऱया या लोककथा, लोककला बहुतांशी मौखिक परंपरेने चालत येतात. पुढील पिढ्यांसाठी त्याचे जतन व संवर्धन करण्यासाठी रोज केरकेट्टा यांनी खडीया भाषेच्या लोककथांच्या स्वतंत्र अभ्यासाचे एक पुस्तक केले.

खडीया बोली मौखिक परंपरेची असल्याने लिपी म्हणून देवनागरी लिपीत तिचे लेखन केले जाते. रोज यांनी लोककथा, कविता याबरोबरच हिंदीतील मुन्शी प्रेमचंद यांचे लोकप्रिय साहित्यही खडीया बोलीत अनुवादित केले. रोज यांच्या घरात साहित्याची परंपरा पुढेही चालू राहिली. त्यांच्या कन्या वंदना टेटे यांनी रोज यांचे साहित्य हिंदीत अनुवादित केले. खड़िया लोक कथाओं का साहित्यिक और सांस्कृतिक अध्ययन (शोध ग्रंथ), प्रेमचंदाअ लुङकोय (प्रेमचंद की कहानियों का खड़िया अनुवाद), सिंकोय सुलोओ, लोदरो सोमधि (खड़िया कहानी संग्रह), हेपड़ अवकडिञ बेर (खड़िया कविता एवं लोक कथा संग्रह), खड़िया निबंध संग्रह, खड़िया गद्य-पद्य संग्रह, प्यारा मास्टर (जीवनी) पगहा जोरी-जोरी रे घाटो (हिंदी कहानी संग्रह), जुझइर डांड़ (खड़िया नाटक संग्रह), सेंभो रो डकई (खड़िया लोकगाथा) खड़िया विश्वास के मंत्र (संपादित), अबसिब मुरडअ (खड़िया कविताएं) ही रोज केरकेट्टा यांची काही महत्त्वाची पुस्तके.

त्यांच्या कथा, कवितांमधून त्या झारखंडच्या जंगलातील समृद्ध निसर्ग, तिथले लोकजीवन, सार्थ लोकपरंपरा, भाषा यांचे वर्णन करतात. शहरीकरणाच्या रेट्याखाली जंगलतोड वाढली. आदिवासी विस्थापित होऊ लागले. तेव्हा सामाजिक जीवनात सक्रियतेने वावरणाऱया रोज यांनी त्याविरुद्ध आवाज उठवला. लेखमाला लिहिल्या. झारखंडच्या जंगलांचे महत्त्व सरकार व जगासमोर आणले. म्हणून आजही ही जंगले बऱयाच प्रमाणात टिकून आहेत.

रोज यांच्या साहित्याचा हिंदीसोबतच इतर भारतीय भाषांमध्येही अनुवाद झाला. त्यांच्या नाटिका आकाशवाणीवर प्रसारित झाल्या. देशांतर्गत अनेक मानसन्मान त्यांना प्राप्त झाले. परंतु या पुरस्कारांना अधिक महत्त्व न देता अखेरपर्यंत त्या खडीया बोली व आदिवासी समाजासाठी झटत राहिल्या. एप्रिल 2025 मध्ये त्यांनी शेवटचा श्वास घेतला तेव्हाही त्या कार्यरत होत्या. माणूस भाषेशी, त्याच्या मातीशी एकनिष्ठ असतो म्हणजे वेगळे तरी काय असते?
[email protected]