रत्नागिरीचे माझ्यावर ऋण! नागरी सत्कार प्रसंगी प्रकट मुलाखतीत पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांनी व्यक्त केल्या भावना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रत्नागिरीचे माझ्यावर ऋण आहेत. याच रत्नागिरीत मी मॅट्रीक झालो. माझी पहिली कथा रत्नागिरीतील मासिकात प्रसिद्ध झाली. रत्नागिरीत झालेल्या साहित्य संमेलनात मला अध्यक्ष होण्याची संधी मिळाली आणि आज त्याच रत्नागिरीत माझा नागरी सत्कार होत आहे, असे उद्गार ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांनी काढले. ते रत्नागिरीतील स्वातंत्र्यवीर वि.दा.सावरकर नाट्यगृहात कोकण मराठी साहित्य परिषदेच्या वतीने आयोजित नागरी सत्कार सोहळ्यातील प्रकट मुलाखतीत बोलत होते.

आपल्या मुलाखतीत मधुमंगेश कर्णिक यांनी आपल्या पहिल्या पुस्तकाला पु.ल. देशपांडे यांची प्रस्तावना लाभल्याचे सांगताना पु.ल.देशपांडे यांचा आणि कुसुमाग्रज यांचा आशीर्वाद मिळाल्याचे त्यांनी सांगितले. बॅ.नाथ पै यांच्या आठवणी त्यांनी सांगताना रॅपिड फायर प्रश्नात त्यांनी बॅ.नाथ पै आपले आवडते राजकारणी होते असे सांगितले.

पुढे मधुमंगेश कर्णिक म्हणाले की, आपणही साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाची निवडणूक लढवली होती. त्यावेळी कोकणात फक्त दोन मते होती. दोन मते असतील तर कोकणाचा माणूस अध्यक्ष कसा होणार? हा प्रश्न निर्माण होतो. तिथूनच कोकण मराठी साहित्य परिषद स्थापन करण्याची कल्पना मला सुचली. जशी विदर्भ मराठी साहित्य संघटना आहे, पश्चिम महाराष्ट्राची संघटना आहे तशी कोकणाची साहित्य संघटना असावी, असे मला वाटले आणि कोमसाप स्थापन झाली. यावेळी बोलताना मालगुंड येथे केशवसुत स्मारक स्थापन करण्याचा अनुभव त्यांनी सांगितला.

साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक नको

नागरी सत्कार सोहळ्याप्रसंगी ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष विश्वास पाटील उपस्थित होते. त्यांच्याकडे पाहून मधु मंगेश कर्णिक म्हणाले, विश्वास पाटील यांनी सांगितले की निवडणूक नसेल तरच मी साहित्य संमेलनाचा अध्यक्ष होईन. विश्वास पाटील यांची अध्यक्षपदी निवडणूक न लढता निवड झाली. माझेही तेच मत आहे. साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक नको. त्याची निवड करा. निवडणूक लढवायला साहित्यिक राजकारणी आहेत का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

यावेळी मराठी भाषा मंत्री आणि रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांचा नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी कोमसापच्या अध्यक्ष नमिता कीर, साहित्य व संस्कृती मंडळाचे उपाध्यक्ष प्रदीप ढवळ, नगराध्यक्ष शिल्पा सुर्वे, कोकण कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ श्रीरंग कद्रेकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदही रानडे, जयु भाटकर व इतर मान्यवर उपस्थित होते. पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांची प्रकट मुलाखत नमिता कीर, प्रदीप ढवळ, अशोक बागवे, अरूण म्हात्रे आणि अभिजीत हेगशेट्ये यांनी घेतली.