जम्मू-कश्मीरमध्ये ८,००० ‘अनामित’ बँक खाती गोठवली, सुरक्षा दलांनी मोठा हवाला नेटवर्क केला उद्ध्वस्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जम्मू-कश्मीरमधील सुरक्षा यंत्रणांनी सायबर गुन्हेगारी आणि बेकायदेशीर आर्थिक व्यवहारांविरुद्ध आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई केली आहे. बनावट कागदपत्रांच्या आधारे चालवली जाणारी तब्बल ८,००० ‘अनामित’ (Anonymous) बँक खाती सुरक्षा दलांनी गोठवली असून, या माध्यमातून कार्यरत असलेले एक मोठे हवाला आणि मनी लाँड्रिंगचे नेटवर्क उद्ध्वस्त केले आहे.

गेल्या काही काळापासून येथे संशयास्पद आर्थिक हालचालींवर सुरक्षा यंत्रणांचे बारीक लक्ष होते. तपासादरम्यान असे धक्कादायक वास्तव समोर आले की, अनेक खाती ही मृत व्यक्तींच्या नावावर किंवा अस्तित्वात नसलेल्या पत्त्यांवर उघडण्यात आली होती. या खात्यांचा वापर प्रामुख्याने सायबर फसवणुकीतून मिळालेला पैसा वळवण्यासाठी आणि हवाला व्यवहारांसाठी केला जात होता. या कारवाईमुळे गुन्हेगारांचे कोट्यवधी रुपये अडकून पडले असून त्यांचे आर्थिक कंबरडे मोडले आहे.

दरम्यान, डिजिटल युगात बँक खात्यांचा असा गैरवापर रोखण्यासाठी सुरक्षा यंत्रणांनी बँकांना केवायसी (KYC) प्रक्रियेत अधिक कडक नियम पाळण्याचे निर्देश दिले आहेत. या धडक कारवाईमुळे जम्मू-कश्मीरमधील अवैध आर्थिक व्यवहारांना मोठा चाप बसला असून, भविष्यात अशा प्रकारच्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी हे एक मोठे पाऊल मानले जात आहे.