पंतप्रधान मोदी झुकलेले आणि थकलेले, अमेरिका व्यापार करार आणि अर्थसंकल्पावरून काँग्रेस नेते जयराम रमेश यांची टीका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थान–अमेरिका व्यापार करार आणि केंद्रीय अर्थसंकल्प 2026 संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या मुलाखतीवरून काँग्रेसने तीव्र टीका केली आहे. यंदाचा अर्थसंकल्प पूर्णपणे निराशाजनक ठरल्याचे सांगत सरकारच्या धोरणांमध्ये थकव्याची चिन्हे स्पष्ट दिसत असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी (15 फेब्रुवारी 2026) केंद्रीय अर्थसंकल्प 2026 आणि हिंदुस्थान–अमेरिका व्यापार कराराबाबत वृत्तसंस्था पीटीआयला मुलाखत दिली. या मुलाखतीनंतर काँग्रेस नेते, खासदार जयराम रमेश यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून पंतप्रधानांवर टीका केली.

जयराम रमेश यांनी प्रस्तावित अमेरिका व्यापार करारावरही प्रश्न उपस्थित केले. वाढत्या दबाव आणि टीकेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान आता ‘हेडलाइन मॅनेजमेंट’ची रणनीती वापरत असल्याचा आरोप त्यांनी केला. देशातील लाखो शेतकरी आणि इतर घटकांचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न सुरू असून या करारात सरकारने जनतेच्या हिताशी तडजोड केल्याचे त्यांनी म्हटले.

“ही खरी मुलाखत नसून, आधीच तयार केलेली पीआर स्टंट आहे,” असा आरोप करत त्यांनी सध्याच्या परिस्थितीत पंतप्रधान झुकलेले आणि थकलेले दिसत असल्याची टीकाही केली.

जयराम रमेश यांनी केंद्रीय अर्थसंकल्पावरही नाराजी व्यक्त केली. बाजारातून या अर्थसंकल्पाला नकारात्मक प्रतिसाद मिळाल्याचे त्यांनी सांगितले. गुंतवणूकदारांवरही त्याचा फारसा सकारात्मक परिणाम झालेला नाही. त्यामुळेच अर्थसंकल्प सादर होऊन जवळपास दोन आठवडे उलटल्यानंतर आणि संसदेत विरोधकांकडून तीव्र टीका झाल्यानंतर पंतप्रधानांना मुलाखत द्यावी लागल्याचे त्यांनी म्हटले.

पंतप्रधानांचे वक्तव्य नेहमीप्रमाणे प्रभावी वाटणाऱ्या वन-लाइनरपुरतेच मर्यादित असते आणि त्याचा प्रत्यक्ष परिस्थितीशी फारसा संबंध नसतो, असा आरोपही जयराम रमेश यांनी केला.