
दहशतवादी संघटनांच्या वाढत्या सक्रियतेच्या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्र एटीएसने राज्यभरात मोठी शोधमोहीम हाती घेतली आहे. विदर्भातील यवतमाळ, अकोला आणि पश्चिम महाराष्ट्रातील अहिल्यानगरसह एकूण 21 ठिकाणी एकाच वेळी आज छापेमारी करण्यात आली. एटीएसने सर्वांत मोठी कारवाई विदर्भातील यवतमाळ जिह्यात केली आहे. जिह्यातील पुसद आणि उमरखेड या दोन शहरांमध्ये तब्बल 14 ठिकाणी छापे टाकण्यात आले.
एटीएस प्रमुख चंद्रकिशोर मीणा यांच्या थेट नेतृत्वाखाली ही मोहीम राबवली जात असून, एकटय़ा यवतमाळ जिह्यात एटीएसची 20 पथके तैनात करण्यात आली होती. या कारवाईत वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांसह स्थानिक पोलिसांचा मोठा ताफा सहभागी झाला होता.
नगर शहरातील मुकुंदनगर भागात पुन्हा एकदा या पथकाने आज पहाटे तीन वाजल्यापासून कारवाई सुरू केली. सात ते आठ ठिकाणी ही कारवाई करण्यात आली. यात सुरुवातीला काही ठिकाणी शस्त्र्ा सापडली तर काही ठिकाणी रोख पैसे व जमिनींच्या व्यवहारांची कागदपत्रे सापडली पोलिसांनी या ठिकाणी पंचनामा करून त्याची माहिती घेतल्यानंतर त्याचा उलगडा झाला. या कारवाईमुळे या परिसरामध्ये चांगली चर्चा सुरू होती. मुंबई व पुण्याच्या पथकाने या ठिकाणी सापळा रचून ही कारवाई पहाटेपासून सुरू केली. दुपारी तीन वाजता ही कारवाई संपुष्टात आली.
पोलीस अधीक्षकांची भूमिका
या कारवाईबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात आली होती. भिंगार कॅम्प पोलीस आणि अतिरिक्त बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आला होता. या संदर्भात जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी सांगितले की, आम्ही एटीएस पथकाला आवश्यक असलेली स्थानिक माहिती आणि पोलीस बंदोबस्त पुरवला आहे. मात्र, त्यांनी नेमकी काय कारवाई केली, याची सविस्तर माहिती आमच्याकडे नाही.
अहिल्यानगर एटीएसच्या रडारवर
यापूर्वी देखील छत्रपती संभाजीनगर एटीएसने अहिल्यानगरमध्ये कारवाई करून एका संशयिताला ताब्यात घेतले होते. ती घटना ताजी असतानाच आता पुन्हा एकदा पुणे आणि ठाणे पथकाने शहरात तळ ठोकल्याने अहिल्यानगर शहर पुन्हा एकदा एटीएसच्या रडारवर असल्याचे स्पष्ट झाले आहे.
महत्त्वाचे साहित्य आणि कागदपत्रे जप्त
दुपारी 3 पर्यंत चाललेल्या या कारवाईमध्ये पोलिसांनी 7 ते 8 घरांची झाडाझडती घेतली. या वेळी धारदार शस्त्र्ाs, 3 ते 4 लॅपटॉप, मोबाईल फोन आणि काही महत्त्वाची कागदपत्रे हस्तगत करण्यात आली आहेत. या उपकरणांमध्ये अनेक गोपनीय माहिती दडलेली असल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले असून, सर्व साहित्य सीलबंद करून जप्त करण्यात आले आहे. दरम्यान, सुरुवातीला काही ठिकाणी रोख रक्कम आणि जमिनींची कागदपत्रेही आढळून आली होती; मात्र त्यांची पडताळणी केल्यानंतर ते व्यवहार कायदेशीर असल्याचे स्पष्ट झाल्याने सदर कागदपत्रे संबंधितांना परत करण्यात आली.

























































