मद्यधुंद पर्यटकाच्या कारने वृद्धेला चिरडले, श्रीवर्धनमध्ये आदिवासी महिला गंभीर जखमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मद्यधुंद पर्यटकाच्या कारने वृद्धेला चिरडल्याची घटना श्रीवर्धन समुद्रकिनाऱ्यावरील मोरया रिसॉर्ट परिसरात घडली आहे. या चालकाने काजू बी विक्री करणाऱ्या आदिवासी महिलेला जोरदार धडक दिली. या धडकेत महिला गंभीर जखमी झाली असून तिच्यावर माणगाव रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघातानंतर मद्यपी चालक पळून जाण्याच्या तयारीत असताना गावकऱ्यांनी त्याला पकडले आणि पोलिसांच्या ताब्यात दिले. त्याच्याविरोधात श्रीवर्धन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आदिवासी वृद्ध महिला ही मोरया रिसॉर्ट परिसरात काजूच्या बिया विक्री करण्यासाठी आली होती. ती रस्त्यावरून पायी जात असताना दारुड्या कारचालकाने तिला जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की वृद्ध महिला कारच्या काचेवर आपटली. तिचे डोके काचेवर आदळल्याने कारची काच फुटली आहे. तसेच तिच्या डोक्याला आणि कमरेला गंभीर दुखापत झाली आहे. अपघाताची घटना कळताच ग्रामस्थांनी तत्काळ मदतकार्य करत महिलेला शासकीय उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र महिलेची प्रकृती चिंताजनक असल्याने डॉक्टरांनी तिला माणगाव येथील रुग्णालयात पाठवले आहे. घटनेनंतर गावकऱ्यांनी मद्यधुंद चालकाला पकडले असता त्याला उभेही राहता येत नसल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. अखेर ग्रामस्थांनी त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले.

आतापर्यंत तीन अपघात

दिवे आगरमध्ये 31 जानेवारी रोजी मद्यपी कारचालकाने दुचाकीला धडक देत दीड किलोमीटरपर्यंत फरफटत नेले होते.
6 मे 2025 रोजी म्हसळाहून माणगावकडे जाणाऱ्या टेम्पोचालकाने दिनेश शेलार या तरुणाला धडक देत 20 फूट लांब फरफटत नेले होते. 19 एप्रिल 2025 रोजी अलिबाग-मांडव रस्त्यावर इन्होव्हा कारचालकाने दुचाकीवरील दाम्पत्याला 500 मीटर दूरपर्यंत फरफटत नेले होते.