
चेरानगर परिसरातील राज अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये आज पहाटे सवाचारच्या सुमारास जबरदस्त आगडोंब उसळला. या पार्किंगला भीषण आग लागून २९ दुचाकी काही मिनिटांतच खाक झाल्या. आगीचे वृत्त समजताच साखरझोपेत असलेल्या रहिवाशांची जीवाच्या आकांताने एकच पळापळ झाली. जिन्यावरून खाली उतरत असताना झालेल्या चेंगराचेंगरीत पाचजण जखमी झाले आहेत. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. शॉर्टसर्किट किंवा तांत्रिक बिघाडामुळे ही आग लागल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.
डोंबिवली पूर्वेत राज अपार्टमेंट ही पाच मजल्याची इमारत आहे. येथे एकूण ए, बी व सी अशा तीन विंग असून त्यातील राज अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये पहाटेच्या सुमारास अचानक आग लागली. धुराचे लोट निर्माण होऊन ही आग पसरली. इमारतीच्या संपूर्ण परिसरात हा धूर पसरल्याने झोपेत असलेल्या रहिवाशांना श्वास घेणेही कठीण झाले. त्यांनी तातडीने घरातून बाहेर पळ काढला. लहान मुले, वृद्ध, महिला असे सर्व जण जिन्यावरून खाली उतरले. मात्र या धावपळीमध्ये सुमन रावत (४४), सौरभ रावत (१९), गर्न रावत (२१), गीता सावंत (४५) आणि राधेश्याम यादव (२८) हे पाचजण जखमी झाले.
- आगीच्या दुर्घटनेतील सर्व जखमींना तातडीने ऑप्टिलाइट या खासगी रुग्णालयात दाखल केले. त्यातील दोनजणांवर प्राथमिक उपचार करून त्यांना घरी सोडले.
- अन्य तिघेजण रुग्णालयात औषधोपचार घेत आहेत. या आगीत बेसमेंटच्या पार्किंगमधील सर्व एकूण २९ दुचाकी गाड्या जळाल्या असून सोसायटीमधील रहिवाशांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
- आगीची घटना समजताच कल्याण-डोंबिवली महापालि केच्या अग्निमशन दलाने तातडीने धाव घेतली. एक तास झुंज दिल्यानंतर आग आटोक्यात आली.
संशयाचा धूर
डोंबिवली पूर्वेच्या राज अपार्टमेंटमधील पार्किंगला आग लागल्यानंतर आता संशयाचा धूर पसरला आहे. ही आग लावली की लागली याबाबत अनेक तर्कवितर्क सुरू आहेत. दरम्यान त्याची सखोल चौकशी करावी व दोषींवर कारवाई करण्यात यावी, अशी आग्रहाची मागणी सोसायटीमधील रहिवाशांनी महानगरपालिका व पोलीस यंत्रणेकडे केली आहे.



























































